– रिसोड येथील गुन्ह्यातून तीन महिलांची टोळी उघड; आंतरराज्य टोळीशी संबंध असल्याचा संशय!
– लोणार तालुक्यातील टिटवीच्या एका महिलेलाही अटक; कसून तपास सुरू!
लोणार (वाजेद खान) – लग्नासाठी मुली मिळणे ही आता अत्यंत गंभीर समस्या झालेली आहे. वयाची चाळीशी ओलांडलेले अनेक युवक अजूनही विनालग्नाचे मोठ्या संख्येने दिसून येतात. मुलींची घटलेली संख्या यास कारणीभूत असल्याचे सर्वश्रूत आहे. लग्नासाठी मुलीचा शोध घेणे व कसेही करून आपल्या मुलाचे लग्न लावणे हा एक सर्वात मोठा व महत्त्वाचा प्रश्न पालकांसमोर उभा आहे. मुलाचे लग्न लावून देण्यासाठी फक्त मुलगी पाहिजे यासाठी आता कुंडली, समाज, जात, वर्ण, रंग काहीही पाहिल्या जात नाही. सदर बाबीचा गैरफायदा उचलणार्या टोळ्या कार्यरत झाल्या असून, लग्नासाठी मुलगी देतो असे सांगून रिसोड शहरातील एका ३५ वर्षीय युवकास गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रिसोड पोलिसांनी तीन महिला आरोपींना अटक केली असून, विशेष म्हणजे, या तीनही महिलांवर महाराष्ट्र राज्यसह अन्य राज्यातसुद्धा गुन्हे दाखल आहेत. यातील एक महिला ही लोणार येथील असल्याने पोलिस तिच्या इतरही उपदव्यापाचा तपास करत आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या तीनही महिला आरोपींचे आंतरराज्य टोळीशी संबंध असल्याचे दिसते. शारदा भागाजी तनपुरे (वय ३५) राहणार टिटवी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा, पूजा कचरूलाल नीलपत्रेवार (वय ४०) राहणार कोल्हा, तालुका मानवत, जिल्हा परभणी, मनीषा सचिन आढवे (वय २८) राहणार दर्गा रोड, परभणी अशी तीनही आरोपींची नावे असून, यामध्ये पूजा निलपत्रेवार ही महिला मुख्य सूत्रधार आहे. तर मनिषा आढवे ही रिसोड शहरातील त्या युवकाची कथित नवरी आहे. प्रकरण दि. २१ जुलै २०२५ रोजीचे आहे. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिसोड शहरातील एक ३५ वर्षीय युवकास लग्नासाठी मुलगी पाहिजे होती. यासाठी त्याच्याकडून शोधाशोध सुरू होती. यादरम्यान सदर ३५ वर्षीय युवकाचा मामा एका खाजगी वाहनाने प्रवास करीत असताना त्याच वाहनात शारदा तनपुरे ही महिला फोनवर संभाषण करत होती व लग्न जुळण्याचे काम ती करते असे तिच्या संभाषणातून सदर युवकाच्या मामाला समजले. याबाबत मामाने शारदा तनपुरेला आपल्या भाच्याला मुलगी पाहिजे असे सांगितले असता, त्यावरून त्या ठिकाणावरून सर्व हालचाली सुरू झाल्या. मुलगी बघणे व सर्व बाबीची बोलणी झाली व दिनांक २१ जुलै २०२५ ला रिसोड शहरातील एका नामांकित संस्थानावर लग्नसुद्धा लावण्यात आले. यासाठी तत्पूर्वी कायदेशीर बाबीसुद्धा करण्यात आल्या. ज्यामध्ये वकिलामार्फत नोटरी करून सदर लग्न होत असल्याचे नमूद करण्यात आले. त्या संस्थानावर ५०० जणांचा स्वयंपाक करून सर्वांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली. लग्न लावल्यानंतर सर्व पाहुणेमंडळीकडून आशीर्वादही घेण्यात आला. सदर लग्नामुळे वर मंडळीकडून वधूला सोन्याचे दागिनेसुद्धा घालण्यात आले. यासाठी महागडे कपडेसुद्धा घेण्यात आले होते. लग्न लावून झाल्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. संध्याकाळी सर्व पाहुणे आपापल्या घरी निघून गेले वर मुलगाचा तर आपल्याला बायको भेटली याचा आनंद गगनात मावेनासा होता. मात्र, त्यांना याबाबतची पुसटशीही कल्पना नव्हती की, त्यांच्यासोबत काहीतरी विचित्र घडत आहे. दि. २१ जुलैच्या रात्रीच मध्यरात्री सदर नवरी मुलगी ही अंगावरील दागिने, नगदी १ लाख २५ हजार रुपये व कपडे घेऊन फरार झाली. दि. २२ जुलैच्या सकाळी हा प्रकार सदर वर व त्याच्या घरच्यांना समजला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. याबाबत सदर युवकांने रिसोड पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवली असता पोलिसांनी तपास सुरू केला. यादरम्यान दिनांक १७ सप्टेंबरला पूजा कचरूलाल नीलपत्रेवार हिला तर १८ सप्टेंबरला शारदा तनपुरे व मनिषा आढवे हिला अटक करण्यात आली. सध्या तिघेही २२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत असून, पोलिस यांच्याकडून सखोल माहिती घेत आहेत. या महिलांच्या टोळीसोबत पुन्हा कितीजण सामील आहेत, याचा तपास करत आहेत. या प्रकरणांमध्ये पुन्हा आरोपी वाढण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहायक पोलिस अधीक्षक वाशिम नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक संतोष आघाव, महिला पोलिस एएसआय मीनाताई पाथरकर, ज्ञानेश्वर बेले, रवी इरतकर, पोलिस कॉन्स्टेबल सुषमा यांनी केली आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस करत आहे.
सदर लग्न जुळण्याआधी लग्नाची बोलीदरम्यान वधू मंडळीकडून दोन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या दरम्यान १ लाख २५ हजार रुपये मध्ये व्यवहार ठरला होता व नोटरी करण्याचीसुद्धा ठरवण्यात आले होते. कपडे व सोन्याचे दागिनेसुद्धा नवरीला टाकण्यात आले होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींकडून सोन्याचे दागिने हस्तगत केले असल्याची माहिती दिली आहे. सदर तीनही महिला आरोपी ह्या आंतरराज्यीय टोळीशी जुळलेल्या असल्याचे समजते. त्यांनी यापूर्वी अनेक जणांना गंडा घातला असल्याचेही समोर आलेले आहे. सदर महिलांवर परभणी, बीड, जालनासह अन्य राज्यातही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे. सदर तीनही महिलांना अटक करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. सदर आरोपीनी वेगवेगळ्या आधार कार्डसुद्धा बनवलेले माहिती समोर आली आहे.