– परिसरातील गावांचा डोंगरी भागात समावेशासाठी प्रयत्न करण्याची दिली ग्वाही!
– तहसीलदार नीलेश मडकेंचे काम ‘सेवाभावी’!; चांगल्या अधिकार्यांच्या पाठीमागे उभे राहण्याचे केले आवाहन
– देऊळगाव साकरशा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाला मोठा प्रतिसाद!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – लोकशाहीमध्ये जनता ही सार्वभौम आहे. परंतु काही नोकरदारांकडून जनतेची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी नित्याने येत असतात. परंतु आता हे चालणार नसून, जनतेच्या कामासाठी कोणतीही घुसखोरी खपवून घेतल्या जाणार नाही, असा सज्जड दम आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिला. देऊळगाव साकरशा परिसरातील गावांचा डोंगरी भागात समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. आजकाल चांगले अधिकारी धुंडूनही मिळत नाहीत, त्यामुळे त्यांना जपा, असे आवाहन करत तहसीलदार नीलेश मडके यांच्या सेवाभावी वृत्तीचेदेखील आमदार सिद्धार्थ खरात यांनी तोंडभरून कौतुक केले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पंधरवाडा शुभारंभ काल, दि. १९ सप्टेंबर रोजी तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथे आमदार सिद्धार्थ खरात यांचे हस्ते करण्यात आला. यानिमित्त स्थानिक सरस्वती महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात बोलत होते. विशेष म्हणजे, या अभियानाला पहिल्याच दिवशी जोरदार प्रतिसाददेखील मिळाला. पुढे बोलताना आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले की, आपण जनतेच्या कामासाठी बांधील असल्याने आपल्या समस्या बेधडक सांगा. रस्ते व सभागृह बांधणे म्हणजे विकास नसून, त्याचबरोबर चांगले शिक्षण, रोजगारदेखील महत्वाचा आहे. यासाठी आपले प्रयत्न सुरुच असल्याचे सांगत, ढगफुटीसदृश पावसाने मतदारसंघात झालेल्या नुकसानीसाठी आपल्या प्रयत्नाने ८० कोटींचे वर निधी मंजूर झाला असून, लवकरच वाटप सुरू होईल, असेही ते म्हणाले. नोकरी लागली की काही कर्मचारी लवकरच रंग दाखवायला सुरुवात करतात. परंतु तहसीलदार नीलेश मडके याला अपवाद असून, त्यांना आणखी पाच वर्षे मेहकरातच ठेवायचे आहे, म्हणजे जनतेची कामे रेंगाळणार नाहीत, असेही आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.
तहसीलदार नीलेश मडके यांनी संजय गांधी, श्रावण बाळ, शेतकरी फार्मर आयडी, वारसा नोंदी, फळबाग योजना, रेशनकार्ड आदिंसह विविध योजनांची माहिती देत, सदर कामे या अभियानातून होणार असल्याने वेळ व पैसा वाचणार आहे. त्यासाठी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मडके यांनी केले. विशेष म्हणजे तहसीलदार मडके यांनी स्वतः अनेकांच्या समस्या यावेळी मार्गीदेखील लावल्या. शिबिरात आमदार सिद्धार्थ खरात, तहसीलदार नीलेश मडकेंसह मान्यवरांच्याहस्ते लाभार्थ्यांना विविध दाखल्यांचे वाटपसुद्धा करण्यात आले. यावेळी सरपंच संदीप अल्हाट, शिवसेना तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, संभाजी ब्रिगेडचे प्रदीप बिल्होरे, सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रतनलाल दुगड, वैद्यकीय अधिकारी उमेश नामदेव, निरिक्षण अधिकारी नवशकुमार बोरूडे, ग्रामपंचायत अधिकारी अनंत आघाव,प्राचार्य धामोडकर, रामदास महाराज, माजी सरपंच सखाराम आमले, पत्रकार प्रमोद देशमुख, पत्रकार दशरथ गायकवाड, सर्कल प्रमुख गजानन राठोड, शिवसेना (शिंदे ) शाखाप्रमुख दिलीप नवत्रे, रामेश्वर बुंधे, मंडळ अधिकारी बालाजी अनमोड, तलाठी सर्वश्री बालाजी माने, एच. आर. बोरे, सहाय्यक कृषी अधिकारी सिरसाठ, कर्मचारी अश्विन ठाकरे, निरंजन शुक्ला, मोहन ढोणे, शिवसाक्षी मापारी, संध्या शेळके, दिव्या ढोरे, बी.एम.राठोड, शेख गुलाब, गणेश पाटील, जयसिंग चव्हाण, मन्नानखा पठाण, कृष्णा चव्हाण, नरेश साठे, पंडित देशमुख,सागर पायघन, दीपक धोत्रे, किशोर चव्हाण, विजय होणे, मनोज गोतरकर, भिकाजी गायकवाडसह कर्मचारी व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिराचे यशस्वी आयोननाबद्दल मंडळ अधिकारी बालाजी अनमोड व प्रभारी तलाठी बालाजी माने यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. संचलन प्रा.गजानन मुंडे यांनी केले. यशस्वीतेसाठी महसूल सेवक हमिदबेग मिर्झा, नीलेश वाघ, गजानन ठाकरे, साजिद पठाणसह इतरांनी परिश्रम घेतले.