– स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; कुख्यात गुंडासह चौघे जेरबंद, ७.९० लाखांचा मुद्देमालही हस्तगत!
– नगर – पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ एलसीबीच्या पथकाची कारवाई; पिस्टल, तलवारही जप्त!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या सतर्कतेने भीषण दरोडा टळला असून, एलसीबीने दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात गुंड गौरव घायाळ याच्यासह त्याच्या चार साथीदारांच्या मोठ्या शिताफीने मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीकडून पिस्टल, तलवार जप्त करण्यात आली असून, नगर – पुणे महामार्गावरील चास घाटाजवळ काल रात्री ही धडाकेबाज कारवाई करण्यात आली.
सविस्तर असे, की पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा यांना जिल्ह्यातील मालाविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे ना उघड गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करणेबाबत आदेश दिलेले आहेत. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिष भोये, उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलिस अंमलदार लक्ष्मण खोकले, ह्दय घोडके, दीपक घाटकर, राहुल द्वारके, सुरेश माळी, अतुल लोटके, भीमराज खर्से, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, राहुल डोखे, सोमनाथ झांबरे, भगवान थोरात, विशाल तनपुरे, योगेश कर्डिले, भगवान धुळे, महादेव भांड यांचे पथक तयार करुन मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना देवून पथकास रवाना केले होते. दिनांक २० सप्टेंबररोजी रात्री तपास पथक नगर तालुका पोलिस स्टेशन हद्दीत दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सपोनि हरिष भोये यांना गुप्तबातमीदारामार्फत अहिल्यानगर ते पुणे महामार्गावर चास घाटाजवळ एक काळ्या रंगाची इनोव्हा गाडी (क्रमांक एम.एच.०१.व्ही.ए. ७४२२) हिच्यामधून गौरव घायाळ व त्याच्याबरोबर ३ ते ४ इसम दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात थांबलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पथकाने बातमीतील ठिकाणी दिनांक २० सप्टेंबरच्या रात्री ०३.५० वाजेच्या सुमारास जावून खात्री केली असता, चास घाटाच्या अलीकडे एक काळ्या रंगाची इनोव्हा रस्त्याच्या कडेला अंधारामध्ये थांबल्याचे दिसून आले. पथकानी सदर इसमांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे १) गौरव हरीभाऊ घायाळ वय-२४ वर्षे रा. सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर, २) सतिष बाळासाहेब पावडे वय ३५ वर्षे, मूळ रा. दरोडी, ता. पारनेर हल्ली रा. सुपा, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर, ३) अनिकेत रमेश साळवे वय २९ वर्षे रा.ओम एन्टरप्रायजेसच्या पाठीमागे, सुपा ता. पारनेर, जि. अहिल्यानगर ४) विशाल सुरेश जाधव वय २३ वर्षे रा. अपधुप रोड, सुपा, ता. पारनेर जि. अहिल्यानगर ५) गोविंद बबनराव गाडे वय ३६ वर्षे रा. ग्रामपंचायत मागे, सुपा, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या संशयितांना अंधारात थांबण्याचे कारण विचारले असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. पथकाने पंचासमक्ष संशयितांची अंगझडती घेतली असता, त्यांच्या कब्जात ३० हजार रूपये किमतीचे १ पिस्टल व १ जीवंत काडतुस, ५००/- रुपये किमतीचे १ तलवार, १००/- रूपये किमतीचे १ गिलव्हर, १ बेसबॉलचा दांडका, ६० हजार रूपये रुपये किमतीचे ६ वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, ७ लाख रूपये किमतची एक इनोव्हा चारचाकी वाहन, असा एकूण ७ लाख ९० हजार ६०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपी गौरव हरीभाऊ घायाळ वय-२४ वर्षे रा. सुपा ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांच्याविरुध्द सुपा, पारनेर, नगरसह विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या सर्व आरोपींविरोधात अहिल्यानगर तालुका पोलिस स्टेशन येथे गु.र.नं.८३९/२०२५ भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१०(४), ३१० (५), ३१०(६), आर्म अॅक्ट ३/२५, ४/२५ प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यातील एकूण ७,९०,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अहिल्यानगर तालुका पोलिस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास अहिल्यानगर तालुका पोलिस स्टेशन हे करीत आहेत. ही कारवाई सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.