– खंडाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त
– खंडाळासह शेलगाव जहागीर, तेल्हारा परिसरात जोरदार पाऊस, नदीला पूर
चिखली (राजेश लोखंडे) – चिखली तालुक्यात काल (दि.१९) झालेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आले असून, तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथे शेतातून घरी परतणारे शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग (वय ८५) हे नदीला आलेल्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. काल रात्रीपासून त्यांचा शोध सुरू होता. परंतु, आज सकाळी त्यांचा मृतदेह खंडाळा म. ते शेलगाव जहागीर नदीपात्रात आढळून आला.
चिखली तालुक्यात सद्या जोरदार पाऊस सुरू असून, नदी व नाल्यांना पूर आलेले आहेत. कालदेखील खंडाळा मकरध्वज, शेलगाव जहागीर, तेल्हारा परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने खंडाळा येथील नदीला पूर आला असून, शेतकरी लक्ष्मण रामराव ठेंग (वय ८५, रा. खंडाळा म.) हे शेतातून परत येत असताना त्यांचा नदी काठावरून पाय घसरल्याने ते नदीच्या वेगवान प्रवाहात वाहून गेले. रात्र झाली तरी ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. या घटनेची माहिती क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे नेते विनायक सरनाईक यांनी तातडीने चिखलीचे ठाणेदार संग्राम पाटील व तहसीलदार संतोष काकडे यांना दिली असता, पोलिस व महसूल प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. काल रात्रीपासून नातेवाईक व गावकरी शोध घेत होते. परंतु, रात्रीमुळे शोधकार्यात अडथळे आले. आज सकाळी गावकरी यांनी शोध घेतला तेव्हा, खंडाळा ते शेलगाव जहागीरकडे जाणार्या नदीपात्रात समोर असलेल्या कट्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. या दुर्देवी घटनेने खंडाळा गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक लक्ष्मण ठेंग यांच्या पश्च्यात पंजाब लक्ष्मण ठेंग (मुलगा), गोदावरी लक्ष्मण ठेंग (पत्नी), पुष्पा पंजाबराव ठेंग (सून), गौरव पंजाबराव ठेंग (नातू), नेहा (पंजाबराव ठेंग (नात) व बराच मोठा आप्त परिवार आहे.