– अॅड.शर्वरी सावजी-तुपकर यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे मिळाला दिलासा; ५० हजाराच्या जातमुचलक्यावर मिळाली जमानत!
बुलढाणा (प्रतिनिधी) – मोताळा तहसीलदारपदी कार्यरत असलेले हेमंत पाटील यांना वर्ग दोनमधील जमीन वर्ग एकमध्ये समाविष्ट करण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. दरम्यान, काल त्यांच्या जामिनावर सुनावणी होती. यावेळी त्यांच्यावतीने अॅड. शर्वरी सावजी- तुपकर यांनी प्रभावी बाजू मांडत युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने तहसीलदार हेमंत पाटील यांची ५० हजाराच्या जातमुचलक्यावर जमानत मंजूर केली.
मोताळा तालुक्यातील रोहीणखेड येथील तक्रारदार ऋषिकेश पाटील यांनी अकोला लाचलुचपत विभागाकडे मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांची तक्रार केली होती. ऋषिकेश पाटील यांच्या मामाची थड येथील गट नंबर २३ मधील ०१.६२ हेक्टर आर शेतजमीन सातबारा उतार्यावर भोगवटदार वर्ग दोनमधून वर्ग एकवर करावयाची होती, असे त्यांचे म्हणने होते, यासाठी त्यांच्या मामाने तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला होता. परंतु त्यांचे मामा अशिक्षित असल्याने तक्रारदार ऋषिकेश पाटील हे त्या प्रकरणात लक्ष घालत असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांनी स्वतःचे नावे इसारपावतीदेखील करून घेतली होती. तहसीलदार हेमंत पाटील यांनी सदर जमीनवर्ग दोनमधून वर्ग एक करण्यासाठी एकूण दोन लाख रूपये लाचेची मागणी केली, असा आरोप पाटील यांनी केला आहे. त्यानुसार अकोला एसीबीच्यावतीने तहसीलदार हेमंत पाटील यांच्या बुलढाणा येथील राहत्या घरी १३ सप्टेंबररोजी पडताळणी केली, त्यात लाचेची मागणी निष्पन्न झाल्याने १४ सप्टेंबररोजी त्यांच्या घरी सापळा रचला असता, हेमंत पाटील यांनी दोन लाख रूपयांची लाच स्वीकारली, असा आरोप फिर्यादीने केला. मात्र त्यांना संशय आल्याने त्यांनी ती रक्कम टॉयलेटमध्ये फेकून त्यावर पाणी टाकले व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असाही आरोप होता. घरझडतीदरम्यान त्यांचे घरात ४ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम मिळून आली. त्या रकमेबाबत हेमंत पाटील व त्यांचे कुटुंबातील सदस्यांना स्पष्टीकरण देता आले नाही, म्हणून त्यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ व भारतीय न्यायसंहिताचे कलम २३८, ६२ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. एसीबीच्यावतीने १५ सप्टेंबररोजी हेमंत पाटील यांना विशेष न्यायालय बुलढाणा येथे हजर करण्यात आले, आणि १० मुद्द्यावर पीसीआरची मागणी करण्यात आली. दरम्यान, दुसरीकडे हेमंत पाटील यांच्यावतीने अॅड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी न्यायालयात बाजू मांडली. अॅड. शर्वरी सावजी यांनी एसीबीने मांडलेले १० मुद्दे खोडून काढत प्रभावी युक्तिवाद केला. त्यामुळे न्यायालयाने केवळ घरात सापडलेले ४ लाख ७५ हजार रूपये कुठून आले, ह्याचा तपास करणेकामी दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली. त्यानंतर १७ सप्टेंबररोजी आरोपी असलेले हेमंत पाटील यांना परत न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली. त्यानंतर अॅड. शर्वरी सावजी- तुपकर यांनी आरोपीच्यावतीने जमानत मिळणेकामी अर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने एसीबीचे म्हणणे मागविले पण एसीबीने त्या दिवशी आपले म्हणणे दिले नाही, त्यामुळे दुसरे दिवशी १८ सप्टेंबररोजी सुनावणी नेमण्यात आली. परंतु त्या दिवशीदेखील एसीबीचे तपास अधिकारी मासिक आढावा बैठकीसाठी अमरावती येथे गेले असल्याचे कारण पुढे करत एसीबीने परत तारीख वाढवून घेतली. त्यामुळे १९ सप्टेंबररोजी सुनावणी नेमण्यात आली.
तहसीलदार हेमंत पाटील यांची सहजासहजी जमानत होणार नाही याचा पूर्णपणे बंदोबस्त एसीबीने केला होता. परंतु लाचलुचपत संबंधातील केसेसमध्ये विशेष हातखंडा असलेल्या अॅड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी अत्यंत प्रभावीपणे आणि अभ्यासू पद्धतीने आरोपी हेमंत पाटील यांच्या बाजूने युक्तिवाद केला. आपल्या अशिलाला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले असून, फिर्यादी हा आरोपीचा जवळचा नातेवाईक आहे. त्याचे आरोपीचे घरी कायम येणे जाणे असतें व त्याला आरोपीच्या घरात कुठे कोणती खोली आहे हे पुरेपूर माहिती होते, त्यानेच आपले अशिलाचे घरातील टॉयलेटमध्ये रक्कम टाकली असल्याचे युक्तिवादात अॅड. शर्वरी तुपकर यांनी म्हंटले. तसेच त्याचे कोणतेही काम आपल्या अशिला कडे प्रलंबित नव्हते, संबंधीत जमीनमालक माळी समाजाचा तर फिर्यादी कुणबी समाजाचा आहे तर ते एकमेकांचे नातेवाईक कसे..? तसेच फिर्यादीचे कुटुंब राजकारणात सक्रिय आहे, त्यामुळे आकस बुद्धीने त्याने खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतविले आहे, असे मुद्दे उपस्थित करत अॅड. शर्वरी सावजी – तुपकर यांनी जमानतीची विनंती केली. याउलट सरकारी वकिलांनी जमानत अर्ज फेटाळण्याची विनंती केली व आरोपीवर हा दुसरा ट्रॅप असल्याचे न्यायालयाचे लक्षात आणून दिले. परंतु अॅड. शर्वरी सावजी -तुपकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी हेमंत पाटील यांना ५० हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर जमानत मंजूर केली.