– दारूबंदी कायद्याअंतर्गत देशी दारूचे बॉक्स व मोटारसायकल जप्त!
– आरोपीला गजाआड; ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त!
बुलडाणा/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – बुलडाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत आज दि (२९) ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीसांनी मोठी कारवाई करत दारूबंदी कायद्याअंतर्गत अवैध देशी दारूसह एक आरोपीला ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल ६५ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक निलेश तांबे व अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या आदेशानुसार ही धडक मोहीम राबविण्यात आली.
फिर्यादी HC/1904 वनिता शिंगणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भरोसा शिवार परिसरात छापा टाकला. यादरम्यान आरोपीकडून देशी दारूचे ४ बॉक्स (किंमत ₹१५,६८०/-) तसेच मोटारसायकल (किंमत ₹५०,०००/-) असा एकूण ₹६५,६८०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत. या कारवाईत ए.एस.आय. ओमप्रकाश सावळे, ए.एस.आय. राजकुमार राजपूत, एच.सी. गजानन दराडे, एच.सी. दिगंबर कपाटे, एल.एच.सी. वनिता शिंगणे, व पी.सी. दीपक वायाळ यांनी सहभाग घेतला.