– आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावले!
– मुंबईत अभूतपूर्व गर्दी, आझाद मैदान तुडूंब भरले!
– ठाकरे-पवारांनी मराठा-ओबीसींत भांडणे लावू नये – देवेंद्र फडणवीस
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासह इतर मागण्यांसाठी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून, आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांना एका दिवसाच्या आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार, आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात झाली होती. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक सहभागी झाले आहेत. सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत अभूतपूर्व गर्दी झाल्याचे पहायला मिळाले असून, आझाद मैदान तर तुडूंब भरले होते.
लाखो मराठा बांधवांनी मुंबईत प्रवेश केल्याने शहरात भगव्या वादळाने जोर धरला असून, आझाद मैदानाची क्षमता पूर्णपणे भरली आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकात आंदोलकांच्या जल्लोषामुळे प्रचंड गर्दी झाली होती. तर वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना अधिक वेळ रस्त्यांवर थांबावे लागत आहे. आंदोलन मंत्रालय परिसरापर्यंत पोहोचले असून, सरकारचे शिष्टमंडळ संध्याकाळी जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की गेल्या दहा वर्षात आमचं सरकार असतानाच मराठा समाजाला न्याय दिला, आरक्षण दिलं. त्या आधीच्या कोणत्याही सरकारने मराठा समाजासाठी काहीही केलं नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मराठा आणि ओबीसींमध्ये भांडण लागावं अशी ठाकरे-पवारांची इच्छा असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक असून चर्चेतून मार्ग काढू, असेही फडणवीस म्हणाले. दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी एक दिवसाची मुदतवाढ मागितली असून, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण विधान केले. ते म्हणाले की, ‘या प्रकरणात कायद्याच्या चौकटीत राहून आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिस प्रशासन योग्य ती कार्यवाही करेल.’ दरम्यान, या आंदोलनामुळे मुंबईत वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला होता. आझाद मैदान परिसरातील मंत्रालयाच्या दिशेने येणारा रस्ता पूर्णपणे बंद पडला होता. मोठ्या संख्येने आंदोलक रस्त्यावर बसून आंदोलन करत असल्यामुळे या भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
गुणरत्न सदावर्ते यांची पोलिस महासंचालकांकडे तक्रार!
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त आणि आझाद मैदान पोलिस स्टेशनकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील आणि आंदोलनकर्त्यांनी अटी-शर्तींचं उल्लंघन करून आंदोलन केल्याचा आरोप करत, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच, आंदोलनादरम्यान नियमभंग केल्यामुळे उद्धव ठाकरे, संजय जाधव आणि बजरंग सोनवणे यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.