– कर्नाटकातील चित्रपट निर्मात्याकडून पैसे उकळणे महागात पडले!
– पाचही पोलिसांविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल!
चिखली (राजेश लोखंडे) – कर्नाटकातून आलेल्या वाहनाला अडवत, त्यातील चित्रपट निर्मात्यासह चालकाला धमकावत, जबरदस्तीने पैसे उकळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाणा – चिखली मार्गावर घडला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या आदेशावरून या खंडणीखोर पाच वाहतूक पोलिसांविरूद्ध गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. आता या पाचही पोलिस कर्मचार्यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबीत केले असून, या कारवाईने रस्त्यावर वाहने अडवून खंडणी मागणार्या खंडणीखोर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
कर्नाटक राज्यातून मलकापूर येथे एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी जागा पाहण्यासाठी जात असलेल्या कारला पोलिसांनी अडविले होते. कारवाई टाळण्यासाठी त्यांना धमकावत तसेच त्यांच्याकडून खंडणी उकळण्यात आली होती. बुलढाणा- चिखली रस्त्यावर हा प्रकार घडला होता. यात दोन ठिकाणी या कार अडवून सुरवातीला १५०० रुपये ऑनलाईन तर काही अंतरावर ५० हजार रुपये घेण्यात आल्याचे समोर आले होते. परराज्यातून आलेल्या कार चालकाला ब्लॅकमेल करून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळणार्या पाच वाहतूक पोलिसांच गुन्हेगारी स्वरूपाच वर्तन उघड झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानंतर या पाच पोलिसांविरोधात चिखली पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यात, अभय टेकाळे, गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे, विजय आंधळे व संदीप किरके या पोलिसांचा समावेश असून, हे सर्वजण वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांच्यावर अशोभनीय वर्तन, बेशिस्त व बेजबाबदारपणा करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. यातून त्यांना निलंबीत करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडालेली आहे.
कर्नाटकातील चल्लकेरे येथील ताज अ. रहमान (वय २३) अकिब अरमान रहेमतुल्ला, शेख इब्राहीम अब्दुल कादिर आणि जुबेर अहमद जाफर हे आपल्या सहकार्यांसह कारने मलकापूरकडे एका चित्रपट शूटिंगसाठी लोकेशन पाहण्यासाठी येत होते. मात्र चिखली- बुलढाणा मार्गावर त्यांची कार दोन वाहतूक पोलिसांनी अडविली. वाहनाची कागदपत्रे मागवून कारवाई टाळण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी या पोलिसांकडून करण्यात आली होती. तडजोडीअंती जवळच असलेल्या चहा विक्रेत्याकडे १५०० रुपये ऑनलाईन दिल्यानंतर गाडी सोडण्यात आली होती. तर काही अंतरावर गेले असताना ताज रहमान यांना आणखी तीन पोलिसांनी पाठलाग करत वाहन अडवले. वाहनात ठेवलेल्या एअर रायफलच्या आधारे गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, त्यांनी तब्बल २ लाख रुपयांची मागणी केली. याठिकाणीदेखील तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे ठरले. ताज रहमान यांना संशय आल्यामुळे त्यांनी वाहनासह घटनास्थळावरून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यावेळी वाहनात बसलेल्या दोन पोलिसांनी पैसे नको, पण आम्हाला उतरवा, असे सांगितले. ताज यांनी वाहन थांबवून त्यांना खाली उतरवले. या प्रकरणी चिखली पोलिसांत तक्रार देण्यात आल्यानंतर पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये अभय टेकाळे, गजानन भंडारी, विठ्ठल काळुसे, विजय आंधळे, संदीप किरके यांचा समावेश आहे.