– फिल्म मेकरकडून मागितले दोन लाख; अपघातानंतर उघड झाली कारस्थानाची कथा!
चिखली (राजेश लोखंडे) – कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यातील फिल्म मेकर ताज अब्दुल रहेमान रहमतुल्ला (वय २३) हे आपल्या सहकार्यासह तवेरा गाडीतून (केऐ ११ ऐ २८६२)ने मलकापूरकडे निघाले होते. चिखली बायपास रोडवर ट्राफिक पोलिस अभय व त्याचा साथीदार किरके यांनी त्यांची गाडी थांबवून कारवाई टाळण्यासाठी दीड हजार रूपये रूपये पेटीएमवर भरण्यास भाग पाडले.
पुढे काही अंतरावर, एक पांढर्या रंगाची किया कार त्यांच्या मागे आली व पुन्हा गाडी अडवण्यात आली. गाडीतून उतरलेल्या तीन अज्ञात पोलिसांनी गाडीची तपासणी करत एअर रायफल पाहिली आणि त्यावरून दोन लाख रुपयांची मागणी केली. घाबरलेल्या फिर्यादीने पैसे नसल्याचे सांगितले असता, पोलिसांनी ५० हजार रुपये देण्यास भाग पाडले. फिर्यादीला शंका आल्याने त्यांनी गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. परंतु गोंधळात गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. त्यानंतरही ते तिघे पोलिस घटनास्थळी पोहोचून पैशांची मागणी करत राहिले. परंतु स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली की, ही गोष्ट कुणालाही सांगू नकोस. फिर्यादीच्या तक्रारीनंतर चिखली पोलिसांनी आरोपी ट्राफिक पोलिस अभय, पोलिस किरके व तीन अनोळखी पोलिसांविरोधात खालीलप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर हे करत असून, आरोपींची ओळख पटवण्याचे व अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना पोलिस खात्याच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अशा पोलिसांवर तात्काळ निलंबन व कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.