– चिखली, देऊळगावराजा तालुक्यांतील काही भागालाही झोडपले
– हिवरखेड पूर्णा येथे पुरात वाहून दोन बैलांचा मृत्यू; शेतकर्यांचे मोठे नुकसान!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील हिवरखेड पूर्णा व निमगाव वायाळ परिसरासह तालुक्यातील काही भागासह चिखली व देऊळगावराजा तालुक्यांतील काही गावांत आज (दि.६) दुपारी झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हिवरखेड पूर्णा येथील शरद नागरे या शेतकर्यांचे दोन बैल ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून जाऊन मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली.
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. अनेक शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकांवर पाणी साचून पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना समजताच तहसीलदार अजित दिवटे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, ग्राम महसूल अधिकारी मोगल, महसूल सेवक राजू खरात यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने हिवरखेड पूर्णा व निमगाव वायाळ येथील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने शेतकर्यांना मदत मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.