– ७०० ते ८०० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी घेतला प्राचीन नाण्यांच्या प्रदर्शनीचा लाभ
– चिखली येथील नाणेतज्ज्ञ दिलावर शेख यांच्या नाणी प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद
चिखली (राजेश लोखंडे) – राजाभाऊ बोंद्रे उर्दू आणि मराठी नगर परिषद शाळा चिखली येथे भव्य दिव्य नाण्यांचे प्रदर्शन दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी पार पडले. यात ७०० ते ८०० विद्यार्थी, विद्यार्थिनींनी प्राचीन नाण्यांच्या प्रदर्शनीचा लाभ घेतला.
अडीच हजार वर्षांपासून देशाची अर्थव्यवस्था कशी होती, त्यावेळची अखंड भारताची संस्कृती काय होती, याबद्दल सर्वच माहिती या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आली. पंचमार्क मगध महाजनपद, चंद्रगुप्तमौर्य नाणी, समुद्रगुप्त नाणी, कुशाण कनिष्कांची नाणी, सातकर्णी सातवाहन नाणी, रुद्रदमन क्षत्रप नाणी, शेरशाह सूरी नाणी, अकबर, शाहजहान मुघल नाणी, दि. ०६ जून १६७४ शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यानची छत्रपती शिवाजी महाराजांची नाणी, राजाराम महाराज यांची जिंजी येथील सोन्याची फणम नाणी, थोरले शाहू महाराज यांची नाणी, पेशवेकालीन नाणी, टिपू सुलतान यांची नाणी, अहिल्याबाई होळकर यांची नाणी, ब्रिटिश सरकारची नाणी आणि देश स्वातंत्र्य झाल्यानंतरील नाणी, ब्रिटिशकालीन मेडल्स, पोस्ट तिकिटे, माप, दुर्बीण अशा सर्वच ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा या ठिकाणी करण्यात आला. वेळोवेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींना इतिहासातील प्रश्न विचारून त्यांना बक्षीस म्हणून नाणीही देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय पुरस्कृत ताज नाणी व वस्तू संग्रहालयाचे सर्वेसर्वा नाणेतज्ञ शेख दिलावर यांनी राजे महाराजांच्या नाण्यांची माहिती व देशाच्या प्राचीन संस्कृतींबद्दल मौलिक माहिती दिली. शाळेतील सर्वच शिक्षकवृंदांनी या प्रदर्शनीवेळी मोलाचे सहकार्य केले. समाजामध्ये इतिहास आणि आपल्या देशाची संस्कृती रुजवणे हाच माझा मुख्य उपक्रम आहे, असे यावेळी नाणेतज्ञ शेख दिलावर म्हणाले. दयानंद निकाळजे सर, प्रवीण डोंगरदिवे साहेब, नरेंद्र कुठे सर, ७०० विद्यार्थी व विद्यार्थिनींची आणि शिक्षकवृंदांची उपस्थिती यावेळी लाभली.