– शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी; साखरखेर्डा नगरीतून निघणार पालखी मिरवणूक!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – वीरशैव समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या साखरखेर्डा येथील श्री पलसिध्द महास्वामी मठात दि.१२, १३ व १४ ऑगस्ट रोजी श्रीमदजगदगुरू पलसिध्द शिवाचार्य महास्वामींचा ९६७ वा स्मृतीमहोत्सव साजरा होत आहे. तीनही दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकल
मानव जातीच्या कल्याणासाठी उच्च उदात्त मूल्याचा पुरस्कार करणार्या विदागम प्रसिद्ध अशा श्रीमदजगद्गुरू पंचाचार्यांनी सर्वम् शिवमय जगत् हा समानतेचा संदेश विश्वाला देण्यासाठी वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्यांनी जगदगुरुंनी व प्राचीन शिवशरणांनी शिवसमतांनी तसेच धर्मगुरू शिवाचार्यांनी शूद्र, ब्राह्मण, स्त्री, पुरुष असा उच्च नीच भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार सांगणारी परंपरा भारत देशात उज्वल केली आहे. दहाव्या शतकात या सर्वोदयकांक्षिणी परंपरेत उज्जयिनी सध्दर्म सिंहासनाधीश्वर १००८ श्रीमज्जगदगुरु पलसिध्द महास्वामी होऊन गेले. त्यांनी धर्म प्रचारासाठी भारतभर संचार केला, आणि साखरखेर्डा धर्मपीठाची स्थापना करुन तथेच संजीवन समाधी घेतली. बसवपूर्व कालीन धर्माचार्य म्हणून वीरशैव धर्मात व इतिहासात त्यांची ख्याती आहे. अशा श्रीमदजगद्गुरू पलसिध्द शिवाचार्य महास्वामींचा ९६७ वा स्मृतीमहोत्सव या धर्मपीठात वेदान्तचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१२, १३ व १४ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी नामस्मरण एक्का प्रारंभ , दुपारी १२ वाजता शिवदीक्षा व गुरुमंत्र संस्कार विधी , व येणार्या दिंड्यांचे स्वागत, दुपारी चार वाजता साखरखेर्डा नगरीतून पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता सुप्रसिद्ध गायक बाळासाहेब वाईकर यांचे भक्ति संगीत, रात्री शिवजागर , १३ ऑगस्ट रोजी नामस्मरण एक्का समाप्ती, श्रींच्या मूर्तीची व संजिवन समाधीस रुद्राभिषेक व महापूजा, ११ वाजता संत साहित्य व इतिहासाचे गाढे अभ्यासक अनिल स्वामी यांचे व्याख्यान, त्यानंतर मठाधीपती वेदान्तचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा आहे. यावेळी मान्यवरांचे सत्कार व गुरुवर्यांचे आशीर्वचन, दुपारी ४ वाजता महाप्रसाद, रात्री ८ वाजता नागेश महाराज विभुते यांचे कीर्तन आणि जागर, १४ ऑगस्ट रोजी सकाळी श्रींच्या मूर्तीस व समाधीस रुद्राभिषेक, शिवानंद गिरी महाराज यांचे प्रसादाचे कीर्तन, ११ वाजता सद्गुरू वेदान्तचार्य शिवाचार्यरत्न सिध्दलिंग शिवाचार्य, सद्गुरू सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज, सद्गुरू वेदान्तचार्य दिगांबर महाराज, सद्गुरू शिवशंकर शिवाचार्य महाराज, सद्गुरू मरुळसिध्द शिवाचार्य महाराज, सद्गुरू काशिनाथ शिवाचार्य महाराज, सद्गुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज, सद्गुरू शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, सद्गुरू विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज, आष्टी, वेदमूर्ती कैलाससिंग स्वामी, पंडित शिवाप्पा खके गुरुजी, अनिल स्वामी, वेदप्रकाश डोणगावकर, अतिश सोसे यांच्या उपस्थितीत धर्मसभा आयोजित केली आहे, अशी माहिती विश्वनाथ आप्पा जितकर आणि गुड्डाप्पा स्वामी यांनी दिली.
———–