– महाकाल कावड मित्रमंडळाचा उपक्रम; बिबीतील महादेवाला पाणी अर्पण!
बिबी (ऋषी दंदाले) – सालाबादाप्रमाणे याहीवर्षी बिबी येथील महाकाल कावड मित्र मंडळ यांच्यावतीने पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त लोणार येथील पवित्र तीर्थधारेचे पाणी बिबी येथील महादेवाला अर्पण करण्यासाठी आणण्यात आले. या कावड यात्रेत सुमारे २०० भाविक-भक्त सहभागी झाले होते.
सविस्तर असे, की आज दि.२८ जुलै रोजी सकाळी ५ वाजता जगप्रसिद्ध लोणार सरोवराला लागून असलेल्या लोणारच्या धारेचे पाणी पवित्र असा श्रावण महिना असलेल्या पहिल्या सोमवारी बिबी येथील महाकाल कावड मित्र मंडळ यांच्यावतीने याहीवर्षी महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी लोणारवरून आणण्यात आले. कावडमध्ये बिबी व परिसरातील २०० भाविक सहभागी झालेले होते. हर बोला महादेवच्या गजरामध्ये ही कावड यात्रा लोणारवरून शारा, वडगाव तेजन, सुलतानपूर, अंजनी, खळेगाव मार्गे बिबी येथे संध्याकाळी ६ वाजता पोहोचली. कावडचे हे तिसरे वर्ष असून या कावड यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे हनुमंतरायाची व महादेवाची भव्य अशी मूर्ती भाविक खांद्यावर नाचत वाजत गाजत आणतात. कावड पाण्यासाठी व कावडचे स्वागत करण्यासाठी गावातील व परिसरातील बरेच भक्त चिखला फाट्यापासून संतोषी माता मंदिरापर्यंत कावड सोबत आले होते. या कावडयात्रेदरम्यान रस्त्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी आपल्या सहकार्यासोबत तगडा बंदोबस्त ठेवला होता.