– सौरऊर्जा प्रकल्पासाठी बनावट ठराव, बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून शासनाला फसविल्याचे प्रकरण
– अॅड. शर्वरी सावजी-तुपकर यांच्यासह आरोपींच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; सशर्त जामीन मिळाल्याने आरोपींना तूर्त अटकेपासून संरक्षण!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मोताळा येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी बनावट ठराव व बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी मोताळा नगराध्यक्ष माधुरीताई देशमुख यांच्यासह इतर चौघांविरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आपल्याला अटक होऊ नये, यासाठी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून माधुरी देशमुख यांनी अॅड. शर्वरी सावजी -तुपकर यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. अॅड. शर्वरी सावजी -तुपकर यांनी याप्रकरणी न्यायालयात केलेल्या प्रभावी युक्तिवादामुळे माधुरी देशमुख यांचा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.तसेच, इतर आरोपींसाठी इतर वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे त्या आरोपींनाही सशर्त जामीन मिळाला आहे. मोताळा येथे सुरू असलेला सौर ऊर्जा प्रकल्प सध्या वादात सापडला असून, प्रकल्पाविरोधात गंभीर आरोप करताना तक्रारदारांनी सांगितले, की ही जागा विनापरवानगी घेतली गेली असून, कागदोपत्री बनावट परवानगी दाखवली आहे. मात्र, सोलर कंपनीच्या अधिकार्यांनी सर्व कायदेशीर परवानग्या असल्याचा दावा केला आहे. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिस तपास सुरू आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून माधुरी देशमुखसह इतर आरोपी हे भूमिगत झाले होते.
मोताळा येथे सौर प्रकल्प उभारायच्या दृष्टीने पॉवर इंडिया व्हेंचर्स प्रा. लिमिटेड या कंपनीला नगर पंचायतीचा बनावट ठराव व मुख्याधिकारी गणेश पांडे यांची बनावट सही शिक्का असलेले ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा आरोप, व यामुळे नगरपंचायतीचा दहा लाखाहून अधिक विविध स्वरूपाचा कर बुडाला. बनावट कागदपत्रे तयार करण्यासह शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याप्रकरणी मोताळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती माधुरी पुरुषोत्तम देशमुख यांच्या सोबतच स्वीकृत नगर सेवक अमोल देशमुख, नगर पंचायतचे कर्मचारी सुनील मिरकुटे व कंपनीचे कर्मचारी महेश सहाणे, शांताराम लोखंडे यांच्याविरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशन येथे भादंविचे कलम ४२०, ४६७, ४६८ ३४ अन्वये बोराखेडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू यांचे फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. बोराखेडी पोलिसांनी या सर्वांना अटक करण्याची तयारी चालवली होती. परंतु नगराध्यक्षा माधुरीताई देशमुख व इतर सर्व आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून भूमिगत होते. आपल्यावर झालेली ही कारवाई राजकारणातून आणि आकसापोटी झाल्यामुळे सर्वांनी मलकापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जमानत मिळणे करीता धाव घेतली होती. दरम्यान, या प्रकरणी २८ जुलै रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली. माधुरी देशमुख यांचेसाठी अॅड. शर्वरी सावजी- तुपकर यांनी अभ्यासपूर्ण मांडणी करून बनावट ना-हरकत प्रमाणपत्राशी माधुरीताई देशमुख यांचा काही संबंध नसून, राजकीय वैमनस्यातून त्यांना ह्यात गोवण्यात आले आहे ह्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. अनेक प्रभावी मुद्दे मांडून ताकदीने बाजू मांडली, तो युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने नगराध्यक्षा माधुरी देशमुख यांना सशर्त अटकपूर्व जमानत मंजूर केली आहे. तसेच या प्रकरणातील इतर आरोपी असलेले स्वीकृत नगर सेवक अमोल देशमुख, नगर पंचायत मोताळाचे कर्मचारी सुनील मिरकुटे व कंपनीचे कर्मचारी महेश सहाणे, शांताराम लोखंडे यांच्यासाठी वेगवेगळ्या वकिलांनी काम पाहिले. याही आरोपींना न्यायालयाने सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
—————-