– दलित पँथरचे दीपक केदार यांचाही ठिय्या; पीरिपाचे जयदीप कवाडे यांनी घेतली पीडिताची भेट!
– आरोपीच्या अटकेसाठी खामगाव शहर कडकडीत बंद; सर्वत्र शुकशुकाट!
– मेहकरात आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा बुधवारी रास्तारोको!
खामगाव/बुलढाणा (बाळू वानखेडे) – गायचोरीच्या संशयावरून एका बौद्ध तरुणाला प्रथम बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर धर्म तपासण्यासाठी त्याला चक्क निर्वस्त्र केले. ही घटना खामगाव शहरात २३ जुलैच्या रात्री दरम्यान घडली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे. सदर घटनेतील आरोपींना त्वरित अटक करावी, या मागणीसाठी आज, दि. २८ जुलै रोजी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने खामगाव बंदचे आयोजन करण्यात आले होते. सदर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, ऑल इंडिया दलित पँथरचे अध्यक्ष दीपक केदार तसेच पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी काल, दि. २७ जुलैरोजी अकोला येथे जाऊन पीडित तरुण रोहण पैठणकर याच्या तब्येतीची विचारपूस केली तर आरोपीवर मकोका लावत त्वरित अटक करावी, यासाठी दीपक केदार यांच्या नेतृत्वात दलित पँथरच्यावतीने खामगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काल ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले. दरम्यान, बुधवारी (दि.३०) आंबेडकरी चळवळ व भीम सैनिकांच्यावतीने मेहकर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाटिका येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून, तसा इशारा आंबेडकरी चळवळीच्यावतीने देण्यात आलेला आहे.
खामगाव शहरातील श्यामल नगर भागात राहणार्या रोहण संतोष पैठणकर वय २१ वर्ष या बौद्ध तरुणाला गाय चोरीच्या संशयावरून गब्बू गुजरीवाल, राहणार सजन पुरी, प्रशांत संगेले राहणार गांधी ले आउट व रोहीत पगारीया राहणार बालाजी प्लॉट खामगाव या तिघांनी बेदम मारहाण केली. तसेच धर्म तपासण्यासाठी त्याच्या अंगावरील कपडे काढून निर्वस्त्रसुद्धा केले. यामध्ये सदर तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, नाकाचे हाडदेखील मोडले आहे. त्याच्यावर अकोला येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रोहण पैठणकर याने दिलेल्या तक्रारीवरून खामगाव येथील शिवाजीनगर पोलिसात उपरोक्त तिन्ही आरोपीविरुद्ध अनूसुचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक (अॅट्रोसिटी) कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील गब्बू गुजरीवाल यास पाचोरा जि. जळगाव येथून अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना त्वरित अटक करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभाच्यावतीने आज, दि. २८ जुलैरोजी खामगाव बंदचे आयोजन करण्यात आले होते. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनदेखील करण्यात आले. आरोपींना अटक न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे यांनी दिला. दरम्यान, ऑल इंडिया पंथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार तसेच पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांनी काल, दि. २७ जुलै रोजी अकोला येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात जाऊन पीडित रोहन पैठणकर याची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. त्यानंतर दीपक केदार यांच्या नेतृत्वात खामगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आरोपीला मकोका लावत त्वरित अटक करावी, यासाठी ठिय्या आंदोलन केले व याबाबत डीवायएसपी प्रदीप पाटील यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी बंदोबस्त चोख ठेवला होता.