– लोणार शहरातील घरकुल परिसरातील थरारक घटना
– धाडसी पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक; पोलिसांनी जीव धोक्यात घातला म्हणून चिमुकला बचावला!
लोणार (वाजिद खान) – शहराबाहेरील घरकुल परिसरातील एका डोहात बुडणार्या दीड वर्षाच्या मुलाचा पेट्रोलिंग करणारे बीट जमादार व पोलिस कर्मचार्यांनी जीवाची पर्वा न करता, मोठ्या शिताफीने प्राण वाचविले. हा चिमुकला पाण्यात बुडत असल्याचे गस्तीवरून परतणार्या पोलिसांना दिसला. त्यांनी क्षणाचाही विचार न करता, डोहात उड्या घेतल्या. पाण्याच्या प्रवाहातून चिमुकला जसजसा खोलवर जात होता. पोलिस जीवाची परवा न करता, त्या मुलाला पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आणि चिमुकल्या मुलास सुखरूप वाचविण्यात आले. एखाद्या चित्रपटातील थरारक दृश्य वाटावे, असा घटनाक्रम आज (दि.२९) लोणार शहरात घडला. या दोन्हीही पोलिसांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.


लोणार पोलिस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण व पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर निकस हे पेट्रोलिंगसाठी शहरातील घरकुल परिसरात गेले होते. त्या ठिकाणावरून पेट्रोलिंग करून परत येत असताना त्यांना एका डोहाजवळ एक मुलगा ओरडत असताना दिसून आला. त्यानंतर डोहात पाहिले असता, एक दीड वर्षीय चिमुकला पाण्यात बुडताना दिसून आला. क्षणाचाही विलंब न करता पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले व त्यांचा कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. या कामगिरीमुळे सर्वत्र पोलीस कर्मचार्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या घरकुल परिसरातील सदर डोह हा धोकादायक असून, तो बुजविण्यात यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. मात्र अद्यापही प्रशासनाच्यावतीने कोणत्याच उपाययोजना याबाबत करण्यात आल्या नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे.
लोणार पोलिस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण व पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर निकष हे नियमित पेट्रोलिंगसाठी घरकुल परिसरात गेले होते. त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून परत येत असताना त्यांना एक डोहाजवळ चिमुकला ओरडत उभा असल्याचे दिसून आले. त्यांची नजर डोहाजवळ गेली तर एक चिमुकला पाण्यात बुडताना निदर्शनास आला. त्यांनी क्षणाचा विलंब न करता, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले. त्यांच कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पोलिस प्रशासनाचे आभार मानले. देव तारी त्याला कोण मारी, या उक्तीचा या घटनेने सर्वांना प्रत्यय आला. बीट जमादार संतोष चव्हाण व अंमलदार ज्ञानेश्वर निकष हे त्या मुलासाठी साक्षात देवदूत ठरले.