– दोन वर्षे होऊनही मिळाला नाही मोबदला; शेतकर्यांनी दिला आंदोलनाचा इशारा
– शेतकर्यांना त्यांचा मोबदला ताबडतोब द्या : सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर वायाळ
देऊळगावराजा/बुलढाणा (राजेश लोखंडे) – बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांच्या विहीर अधिकरणचा मोबदला त्वरित देण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर सुखदेव वायाळ रा. टाकरखेड वायाळ, ता. देऊळगाव राजा यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. विशेष म्हणजे, पाणीटंचाई काळात स्वतःच्या शेतातील पिकांना पाणी न देता वायाळ यांनी टंचाईग्रस्तांना पाणी दिले होते.
बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईच्या काळात ग्रामपंचायतींनी विहिरी अधिग्रहण करून गावांसाठी पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्या विहिरीतून पाणीपुरवठा करून शेतकरी विहीर मालक यांना मागील वर्षापासून विहिरीतील पाणी हे स्वतःच्या पिकांना न देता, प्राधान्याने गावातील जनतेच्या पिण्यासाठी पाणी पुरवठा केला आहे. परंतु दोन वर्षे होऊनसुद्धा या विहीर मालकास गावांना पाणीपुरवठा करूनही आजपर्यंत त्यांचा शासनाकडील मोबदला मिळालाच नाही, ते सर्व गरीब शेतकरीच आहेत, म्हणून तो पाण्याचा मोबदला त्वरित देण्यात यावा. व आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी विहीरधारकांनी यापूर्वीसुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा यांना दि. २ मे २५ रोजी निवेदन दिले होते. परंतु त्यात कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही. तरी या विषयाची तात्काळ दखल घेऊन या वंचित असलेल्या विहीर अधिग्रहित शेतकर्यांना त्यांचा मोबदला देण्यात यावा. अन्यथा येत्या २० ऑगस्टरोजी या सर्व शेतकर्यांसह न्याय हक्कासाठी तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर वायाळ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.