– मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघात ‘श्रीं’च्या पालखीचे जोरदार स्वागत!
लोणार (वाजिद खान) – ‘गण गण गणात बोते’च्या गजरात भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीने आज, दि. २५ जुलैरोजी दुपारी एक वाजता मेहकर-लोणार मतदारसंघात प्रवेश केला. या पावनक्षणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालखीचे मनोभावे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने तिचे स्वागत केले. पालखी लोणारात मार्गक्रमण करत असताना पावसाने हजेरी लावली. भरपावसात पण भक्तांनी उत्साहात पालखीचे स्वागत केले. तसेच नुकतेच आषाढीत माऊलीच्या पालखीत प्रसिद्ध झालेली गवळण रडू नको बाळा मी पाण्याला जाते या गवळणवर भरपावसात पण महिला भजनी मंडळांनी पावल्या खेळण्याचा आनंद लुटला.
संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरच्या विठूरायाच्या दर्शनानंतर परतीच्या मार्गावर असून, मेहकर मतदारसंघात तिचे आगमन मोठ्या भक्तीभावात व जल्लोषात झाले. आमदार सिद्धार्थ खरात यांच्या उपस्थितीत पालखीचे स्वागत फुलांच्या वर्षावात, वाद्यांच्या गजरात आणि पायी चालणार्या हजारो भाविकांच्या जयघोषात भव्य स्वरूपात पार पडले. या पावन प्रसंगी आमदार सिद्धार्थ खरात यांच्यासोबत अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये काँग्रेस नेते लक्ष्मणदादा घुमरे, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, उबेदभाऊ खान, विठ्ठल चव्हाण, तालुका प्रमुख राजू बुधवत, महिला आघाडी तालुका अध्यक्ष तारामती जायभाये,युवा तालुका प्रमुख जीवन घायाळ, तेजराव घायाळ, मेहकर शहर प्रमुख किशोर गारोळे, साहेबराव हिवाळे, शांतीलालजी गुगलिया, साहेबराव पाटोळे, समदभाई, इकबाल कुरेशी, बादशहा खान, श्रीकांत जाधव, विठ्ठल जाधव, संजय तारु, प्रविण सरदार, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, शेख लालमिया, समाधान ठाकरे, इकबाल कुरेशी, गजू मोरे, माजी नगरसेवक अरुण जावळे, गजानन खरात, गजानन जाधव, नितीन शिंदे, विकास माऊली आदींचा समावेश होता. यावेळी आमदार सिद्धार्थ खरात यांनी गजानन महाराजांच्या चरणी साकडे घालत म्हणाले, ‘आमचा बळीराजा सुखी होवो, त्याच्या शेतमालाला भरघोस भाव मिळो. शेतकरी सुखी तर सर्व समाज सुखी! माऊली गजाननाची कृपा संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यावर राहो आणि जनता नेहमी समाधानी राहो.’ या भक्तिमय सोहळ्याने लोणार शहरातसुद्धा धार्मिक उर्जा आणि आध्यात्मिक आनंद निर्माण केला. गावातील नागरिक, महिला मंडळे, युवक मंडळे यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि संपूर्ण शहर ‘गण गण गणात बोते’च्या जयघोषाने दुमदुमले.
उल्कानगरीत पालखीचे उत्साहात स्वागत!
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील गजानन महाराज यांची पालखी ‘गण गणात बोते’ बरोबरच विठू नामाच्या गजरात किनगावजटूमार्गे शुक्रवारी दुपारी उल्कानगरीत दाखल झाली. पालखी मार्गावर ठिकठिकाणी स्वागत करण्यासाठी लोणार शहर व परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी गर्दी केली होती. पालखीच्या स्वागतासाठी शहरवासीयांनी रस्त्यावर जागोजागी रांगोळी काढल्या होत्या. पालखीचे खास आकर्षण असलेल्या हत्तीअभावी ही पालखी सुनी-सुनी वाटत होती. गणराजविनाच ही पालखी असल्यामुळे भाविकांची त्यासोबतच लहान बाळ गोपाळाची मोठी निराशा झाली. पालखीचे लोणारात आगमन होताच प्रशासक तथा मुख्याधिकारी विभा वराडे यांनी स्वागत करीत दर्शन घेतले. तसेच कृषी उत्पन बाजार समितीचे सभापती बळीभाऊ मापारी, लोणारनगरीचे माजी नगर अध्यक्ष भूषण मापारी, माजी जि.प. सदस्य राजू भाऊ मापारी,साहेबराव पाटोळे, नगरसेवक संतोष मापारी, नगरसेवक डॉ. अनिलभाऊ मापारी, संदिप मापारीसह शहरवासीय व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बिबी येथील पाहुणचार घेतल्यानंतर पालखी शहरातून मार्गक्रमण करीत दि ग्रँड विश्वनाथ मंगल कार्यालय येथे मुकामासाठी थांबली. जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था सालोबाद प्रमाणे इरतकर परिवाराकडून करण्यात आली होती. शनिवारी पहाटे पालखी पुढील प्रवासासाठी म्हणून मेहकरकडे रवाना होईल. पालखीचे दर्शन नागरिकांना सहजरित्या व्हावे, म्हणून लोणार पोलिस प्रशासनाने चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता. शहरातील पालखी मार्गावर विविध मंडळ व सामाजिक संस्थानच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालखीचे स्वागत केले.