— सेवानिवृत्त गुरुजनांना एका विद्यार्थ्याची भावपूर्ण मानवंदना
काल-परवाच श्री संत ज्ञानेश्वर कनिष्ठ कला महाविद्यालयातील मला शिकवणारे प्रा. काकडे सर आणि प्रा. शेळके सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. काळ किती वेगाने पुढे सरकतो, हे पुन्हा एकदा जाणवलं. पण त्यांच्या सहवासातील दिवस आठवले की मन पुन्हा त्या वर्गात जाऊन पोहोचतं. शिक्षकाची खरी किंमत आपल्याला आयुष्यात काहीतरी चांगलं घडू लागल्यावरच कळते. तेव्हा मनापासून वाटतं—
“आम्ही ‘बी’ घडलो… ते आमच्या गुरूंमुळेच!”
मन काळाची पानं उलटू लागतं आणि ते दिवस डोळ्यांसमोर उभे राहतात. तो वर्ग, त्या वर्गखोल्या, गळणारे पत्रे, तीन पायांवर डळमळणारा आणि कुचकुच आवाज करणारा डेस्क, अर्धवट काळा फळा… पण या सगळ्यांपेक्षाही महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणजे माझे शिक्षक. त्या वेळी ते आम्हाला फारसे आवडायचे नाहीत. त्यांची शिस्त, राग, ओरडा आणि प्रसंगी मिळणारी शिक्षा यामुळे त्यांच्याविषयी मनात भीती होती. पण आज जगाचा अनुभव घेताना त्यांच्या प्रत्येक कृतीमागचा हेतू समजतो. काकडे सरांनी शिकवलेली “प्रेमाचा गुलकंद” ही कविता आजही मला तोंडपाठ आहे. ती त्यांनी इतक्या तन्मयतेने शिकवली की तिचा प्रत्येक शब्द मनात कोरला गेला. मात्र, प्रेमाचा गुलकंद चाखण्याची संधी त्यांनी कधीच दिली नाही, हेही तितकंच खरं! त्याचप्रमाणे त्यांनी शिकवलेल्या या ओळी आजही प्रेरणा देतात—
“काट्यामधल्या वाटांमधुनी चालत जा तू पुढे पुढे,
त्या वाटा मग अलगद नेतिल पाऊस भरल्या नभाकडे.
झळा उन्हाच्या सरून जातील, नाचत येईल पानकळा;
त्या काळाच्या भाळावरती, तेजाचा तू लाव टिळा!”
मन भरकटलं की या ओळी मला पुन्हा मार्ग दाखवायच्या. त्या काळी शिस्त लावण्यासाठी सरांच्या हातात छडी असायची. हात लाल होईपर्यंत किंवा छडी तुटेपर्यंत मिळालेला मार तेव्हा अन्याय वाटायचा. शेकडो विद्यार्थ्यांसमोर मार खाल्ल्यावर रागही यायचा. पण आज त्या दिवसांची आठवण आली की स्वतःच्या अपरिपक्व विचारांचीच लाज वाटते. आज मनापासून वाटतं—
“काकडे गुरुजी, आम्ही ‘बी’ घडलो… ते तुमच्यामुळेच!”
माझ्यात वाङ्मयाची गोडी निर्माण केली ती परिहार मॅडम यांनी. त्या नेहमी म्हणायच्या—
“आभाळ पाठीवर घेणाऱ्या हत्तींना विचारून पहा, ते सांगतील— कुणीही कुणाचं नसतं.”
त्या वेळी या वाक्याचा शब्दार्थ समजला होता; पण आज त्याचा लक्ष्यार्थ समजतो. तो त्यांच्या शिकवणीमुळेच. संवादकला, कविता पाठांतर, साहित्याची आवड—हे सारे काकडे सरांनी दिलं. राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र विषयाची गोडी लावणारे प्रा. शेळके सर, मराठी व्याकरण समजावून सांगणारे दिवंगत ठेंग सर, इंग्रजी वाचायला शिकवणारे साळोक सर, बीजगणितातील ‘X’ समजावून सांगणारे गायकवाड सर आणि अभ्यास कसा करावा याचा वस्तुपाठ देणाऱ्या परिहार मॅडम—या सर्व शिक्षकांचा माझ्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. त्यावेळी त्यांनी शिकवलेलं अनेकदा निरर्थक वाटायचं; पण आज प्रत्येक शब्दाचं मोल कळतं. त्यांनी पुन्हा पुन्हा शिकवलेली ही कविता आज जीवनाचं तत्त्वज्ञान वाटते—
“मीच माझा एकटा एककल्ली चालीत गेलो,
अन् धुळीच्या लक्तराची लाज गुंडाळून आलो.
मज कळेना चालताना दुःख कैसे फूल झाले,
अन् कुणाचे दिव्य आशीर्वाद मज देऊन गेले…”
आज समजतं… ते दिव्य आशीर्वाद दुसऱ्या कुणाचे नव्हते; ते माझ्या गुरुजनांचेच होते. कदाचित आज माझे शिक्षक मला आठवतही नसतील. कदाचित अनेक विद्यार्थी त्यांच्या आयुष्यात आले आणि गेले असतील. पण माझ्यासाठी ते आजही माझे ‘आयडॉल’ आहेत. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने एवढंच मनापासून सांगावंसं वाटतं—
“गुरुजी, माझ्यातलं जे काही चांगलं आहे, ते तुमचंच आहे… आणि म्हणूनच अभिमानाने म्हणतो— आम्ही ‘बी’ घडलो… ते तुमच्यामुळेच!”
— आपला विद्यार्थी,
श्री. संतोष ज्ञानेश्वर थुट्टे