-पंतप्रधान आवास व रमाई घरकुल योजनेचे हप्ते रोखल्याने लाभार्थी अडचणीत; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची युवासेनेची मागणी
लोणार (वाजिद खान) : लोणार नगर परिषदेच्या धरसोड कारभारामुळे पंतप्रधान आवास योजना आणि रमाई घरकुल योजनेतील गरीब लाभार्थ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. पुरातन वास्तूच्या १०० मीटर परिघातील नियमाचे कारण पुढे करत नगर परिषदेने लाभार्थ्यांचे पुढील हप्ते रोखल्याने संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी युवासेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नगर परिषदेने सर्व कागदपत्रांची पडताळणी करून पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी दिली होती. त्यानंतर पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. या निधीच्या आधारे अनेक लाभार्थ्यांनी आपली जुनी घरे पाडून नवीन घरांचे बांधकाम सुरू केले. मात्र, घरे अर्धवट अवस्थेत असतानाच प्रशासनाने पुरातन वास्तूच्या १०० मीटर परिघातील नियमाचा आधार घेत पुढील हप्ते आणि मजुरीची रक्कम रोखली.
यामुळे लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, “जर १०० मीटरची अट लागू होती, तर घरकुलांना मंजुरी कशी देण्यात आली आणि पहिला हप्ता कसा वितरित करण्यात आला?” असा सवाल लाभार्थी उपस्थित करीत आहेत. विशेष म्हणजे, काही अधिकारी “पहिला हप्ता चुकून वितरित झाला” असे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या निष्काळजी कारभारामुळे अनेक गरीब कुटुंबांची घरे अर्धवट अवस्थेत राहिली असून, त्यांच्यासमोर निवाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याची गंभीर दखल घेत युवासेना तालुकाध्यक्ष गजानन मापारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून सर्व पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित हप्ते तातडीने वितरित करावेत, तसेच “चुकून हप्ता दिला” असे सांगणाऱ्या आणि या प्रकरणाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. नगर परिषदेच्या या कारभारामुळे गरीब लाभार्थ्यांमध्ये तीव्र संताप असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशाराही लाभार्थी आणि युवासेनेच्या वतीने देण्यात आला आहे.