-अतिक्रमण हटविण्यासह कारवाईचे प्रशासनाचे आश्वासन; मोजणी करून मूळ हद्द निश्चित करण्याची मागणी
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) : बोधेगाव येथील मातंग समाजाच्या सार्वजनिक स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मिसाळ आणि भगवान मिसाळ यांनी सोमवारी (दि. ३ ऑगस्ट) ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर सायंकाळी मागे घेण्यात आले.
यापूर्वी उपविभागीय अधिकारी (पाथर्डी), तहसीलदार (शेवगाव) यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला. बोधेगाव येथील गट क्रमांक १६ मधील मातंग समाजाची सार्वजनिक स्मशानभूमी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या जागेच्या हद्दीतून बेकायदेशीरपणे रस्ता काढण्यात आल्याचा तसेच सार्वजनिक रस्ता बुजवून स्मशानभूमीच्या जागेवर अतिक्रमणाचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली असून मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनामा केला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी अद्याप प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
उपोषणकर्त्यांनी गट क्रमांक १६ ची भूमी अभिलेख विभागामार्फत तातडीने मोजणी करून स्मशानभूमीची मूळ हद्द निश्चित करावी, स्मशानभूमी व सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, संबंधितांवर अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यासह इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत तसेच स्मशानभूमीचे कायमस्वरूपी संरक्षण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. दरम्यान, सायंकाळी मंडळ अधिकारी सुवर्णा वारकड आणि तलाठी बाळासाहेब झिरपे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी मागण्यांवर आवश्यक कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते प्रमोद मिसाळ आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान मिसाळ यांनी आमरण उपोषण मागे घेतले. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करून स्मशानभूमीवरील अतिक्रमण हटवावे व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनाला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला.