– लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील यशस्वी कार्यामागे खडसे साहेबांचे मोलाचे मार्गदर्शन!
– ‘यूट्यूबवर पाहिलेला आदर्श अधिकारी प्रत्यक्ष गुरू ठरला’ – MPSC विद्यार्थ्याची प्रतिक्रिया!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – गुरुपौर्णिमा हा दिवस शिक्षक, गुरू, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. याच पार्श्वभूमीवर सिंदखेडराजा येथील भूमापक प्रकाश चंद्रकांत शिंदे यांनी उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहून त्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कार्यशैलीचे मनापासून कौतुक केले.
प्रकाश शिंदे यांनी आपल्या पत्रात खडसे साहेबांसोबतचा अनुभव कथन केला आहे. १२ मार्च २०२४ रोजी लोकसभा निवडणूक सुरु असताना खडसे साहेबांची सिंदखेडराजा येथे बदली झाली. फक्त दुसऱ्याच दिवशी, १३ मार्चला, निवडणूक विभागाची पहिली मिटींग घेऊन त्यांनी आपल्या जबाबदारीची सुरुवात केली. त्यादिवशीच शिंदे यांची साहेबांशी पहिली भेट झाली. शिंदे यांनी त्या वेळचा उल्लेख करत सांगितले की, सिंदखेडराजा आणि देऊळगाव राजा तालुक्यांचा मिळून बनणाऱ्या मतदारसंघाची फारशी ओळख नसतानाही खडसे साहेबांनी अतिशय कमी वेळेत प्रभावी निवडणूक व्यवस्थापन केलं. त्याच निवडणुकीत शिंदे हे प्रसारमाध्यम समितीचे सहायक नोडल अधिकारी म्हणून काम करत होते. ही त्यांची पहिलीच निवडणूक ड्युटी होती, पण खडसे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे त्यांनी जबाबदारी आत्मविश्वासाने पार पाडली. त्यांनी सांगितले की, “साहेबांनी वेळोवेळी प्रसारमाध्यमांतील जबाबदारी, पत्रकारांशी संवाद, बातम्यांची रचना, योग्य शब्दांची मांडणी याविषयी सूक्ष्म मार्गदर्शन दिलं. हे मार्गदर्शन केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित नव्हतं, तर ते माझ्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोलाचं ठरलं.” शिंदे यांना खडसे साहेबांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे सादर करण्यासाठी एक संकलन फाईल तयार करण्याची जबाबदारी दिली होती. ती फाईल साहेबांना इतकी आवडली की त्यांनी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत ती पोहोचवली आणि त्यांच्या कौतुकास पात्र ठरली. शिंदे हे स्वतः MPSC चे विद्यार्थी आहेत. २०१८ मध्ये त्यांनी यूट्यूबवर पाहिलेल्या खडसे साहेबांच्या मार्गदर्शनात्मक व्हिडिओंमुळेच ते प्रभावित झाले होते. आणि जेव्हा त्याच अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्षात काम करण्याची संधी मिळाली, तेव्हा ती एक स्वप्नपूर्तीच ठरली.
प्रकाश शिंदे यांनी खडसे साहेबांसोबतच्या काही खास आठवणी शेअर केल्या – त्यांच्या लग्नाला साहेब आपल्या संपूर्ण टीमसह आले आणि केलेला नृत्य आजही त्यांना आठवतो. वाढदिवशी साहेब त्यांच्या घरी येऊन शुभेच्छा देऊन गाणं गायल्याचा प्रसंग त्यांच्यासाठी खास आहे. आणि तिसरा क्षण म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मिळालेलं आशीर्वादरूप पत्र – जे ते आजही अत्यंत जपून ठेवतात. शेवटी शिंदे म्हणतात, “साहेब केवळ अधिकारी नाहीत, ते आमच्यासाठी एक आदर्श गुरू आहेत. त्यांनी प्रत्येक सहकाऱ्याशी सन्मानाने वागून आम्हाला कामाच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडायला शिकवलं. त्यांच्या सान्निध्यात काम करणं म्हणजे एक गुरुकुलाचं अनुभवणं आहे.”