– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक विद्याधर महाले पाटील यांनी स्वतः साधला स्वातीताई नागरे यांच्याशी संवाद!
– स्व.कैलास नागरे यांच्या तीनही मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्यास मुख्यमंत्री कार्यालय तयार; श्रीमती नागरे यांच्याकडून अद्याप सरकारला प्रस्ताव नाही!
सिंदखेडराजा (भगवान नागरे) – महाराष्ट्र शासन युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुन नागरे, रा.शिवणी आरमाळ यांनी शेतीला पाणी मिळावे, म्हणून दि.१३ मार्च २०२५ रोजी आत्महत्या करत, बलिदान दिले होते. त्या दुर्देवी घटनेला चार महिने पूर्ण झालेत तरी कुटुंबाला न्याय मिळाला नाही. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये केलेला उल्लेख, की माझ्या मुलांचे व कुटुंबाचे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी व उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावे, आणि ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारल्याची विधानसभेमध्ये घोषणाही केली होती. परंतु, त्याचे पुढे काय झाले? ते अद्याप काहीच आम्हाला कळाले नाही, असे नमूद करत, त्यांच्या पत्नी श्रीमती स्वाती नागरे यांनी दि.९ जुलैरोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय सिंदखेडराजा, तहसील कार्यालय देऊळगावराजा येथे निवेदन देऊन अन्नत्याग आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सविस्तर वृत्त तातडीने प्रसारित केल्यानंतर या वृत्ताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने तातडीने दखल घेतली. तसेच, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या माध्यमातून श्रीमती स्वाती नागरे यांच्याशी त्याच दिवशी संपर्क करून, त्यांच्या मागण्यांबाबत जाणून घेतले. माझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने स्वीकारावी, अशी मागणी त्यांनी यावेळी बोलताना केली. त्याला लगेच सकारात्मक प्रतिसाद देत, आपण तसा प्रस्ताव किंवा पत्र द्या, मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांनी दिली होती. परंतु, अद्यापही श्रीमती स्वाती नागरे यांच्याकडून मुख्यमंत्री कार्यालयाला तसा प्रस्ताव अद्याप देण्यात आलेला नाही. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील श्रीमती नागरे यांच्याशी संपर्क करून, मुलांच्या शिक्षणासाठी खर्चाचा तपशील व याबाबतच्या मागण्यांचा प्रस्ताव सरकारला द्या, याबाबत वारंवार संपर्क साधण्यात आला. त्यानंतर त्यांच्या अनेक वैयक्तिक मागण्या पुढे आल्याचे दिसून आले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तोंडावर श्रीमती स्वाती नागरे यांना पुढे करून कुणी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी तर भाजू इच्छित नाही ना? असा संशय निर्माण होत आहे.
श्रीमती स्वाती नागरे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सरकारला दिलेल्या निवेदनात नमूद होते, की मला १२ दिवसाच्याआत आपल्या स्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ शासकीय-प्रशासकीय यंत्रणेनुसार मिळावी. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्या कुटुंबांचे पालकत्व स्वीकारले आहे, त्याचे पुढे काय झाले, अद्याप काहीच माहिती मला मिळाली नाही. यासाठी म्हणजे सगळ्या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येईल आणि मला व माझ्या मुलांना न्याय मिळेल. याकरिता मी आपल्याकडे निवेदनाद्वारे ही वेळ मागत आहे. ज्यावेळेस स्वर्गीय कैलास नागरे यांच्या अंत्यविधीसाठी व रक्षाविसर्जनासाठी सर्वच राजकीय पुढारी, पालकमंत्री व विविध सामाजिक, राजकीय संघटनेने, सर्व शेतकरी संघटना यांनी भेट दिली, आणि अनेक राजकीय क्षेत्रातील संघटनेने मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची सगळी जबाबदारी उचलली. पण ती सत्यात उतरली नाही, म्हणून खंत वाटत असल्याचे श्रीमती स्वाती नागरे यांनी नमूद केले होते. सध्या अधिवेशन चालू आहे, आणि अधिवेशनामध्ये माझ्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी व पालकत्वाची जबाबदारी ही राज्य सरकारने अधिवेशनात मांडावी, आणि मला न्याय द्यावा. नाहीतर या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आपण मला १२ दिवसाच्याआत वेळ द्यावा, हीच राज्य सरकारकडे युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त कैलास नागरे यांची पत्नी म्हणून मी विनंती करते, असे या निवेदनामध्ये श्रीमती नागरे यांनी नमूद केले होते. नाहीतर मी माझ्या राहत्या घरी शिवणी आरमाळ येथे माझ्या पतीच्या प्रतिमेजवळ अन्नत्याग आमरण उपोषण दिनांक २१ जुलै २०२५ पासून करणार आहे. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या आरोग्याची सर्व जबाबदारी ही प्रशासनाची असेल, जर बलिदान देऊन न्याय मिळत असेल तर तेहीसुद्धा मी करायला तयार आहे. म्हणून राज्य सरकारने माझ्यावर ती वेळ येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे श्रीमती स्वाती नागरे यांनी सरकारला निवेदनाद्वारे कळवले होते.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या वृत्ताची मुख्यमंत्री कार्यालयाकडून लगेचच दखल, व श्रीमती स्वाती नागरे यांना संपर्क!
श्रीमती स्वाती नागरे यांच्या या निवेदनाचे सविस्तर वृत्त ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने ९ जुलैरोजीच राज्यस्तरावर प्रसारित केल्यानंतर, या वृत्ताची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने लगेचच दखल घेतली. व श्रीमती नागरे यांचे निवेदन प्रशासकीय यंत्रणेमार्फत मुख्यमंत्री कार्यालयात पोहोचण्याची वाट न पाहाता, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या माध्यमातून त्याच दिवशी श्रीमती स्वाती नागरे यांच्याशी व्हॉटसअप्ा कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला. तसेच, त्यांच्या सर्व मागण्या जाणून घेतल्या. मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, तसेच कुटुंबाच्या उपजीविकेचा प्रश्न श्रीमती नागरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक तथा वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी विद्याधर महाले पाटील यांच्याकडे मांडला. त्याला लगेचच सकारात्मक प्रतिसाद देत, मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलला जाईल, त्यासाठी तीनही मुलांच्या संबंधित शैक्षणिक संस्थांच्या फीचा तपशील द्या, लगेचच ही मदत आम्ही देऊ. तसेच, आपल्या मागण्यांचा सविस्तर प्रस्ताव द्या, त्यादृष्टीने त्यावर सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे विद्याधर महाले यांनी श्रीमती नागरे यांना सांगितले. त्यावर श्रीमती नागरे यांनी सकारात्मक प्रतिसादही दिला होता. हा प्रस्ताव किंवा त्यांचे तसे पत्र प्रशासकीय यंत्रणेमार्फत येईलच; पण ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’नेदेखील हे पत्र आम्हाला शक्य तितक्या लवकर पोहोचावे, आम्ही तातडीने मदतीचा हात पुढे करू, अशी ग्वाहीही विद्याधर महाले पाटील यांनी दिली होती. त्यादृष्टीने ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने श्रीमती स्वाती नागरे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीबाबतचा प्रस्ताव किंवा पत्र, आणि त्यांत त्यांच्या मागण्यांचा उल्लेख देण्याबाबत वारंवार संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांनी सुरूवातीला दाखवलेला सकारात्मक प्रतिसाद नंतर मावळत गेला. त्यामुळे श्रीमती स्वाती नागरे यांना खरोखर मुलांच्या शिक्षणासाठी सरकारचे सहाय्य हवे आहे, की त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणाला तरी राजकारण करायचे आहे? असा संशय आता निर्माण होत आहे. स्व. कैलास नागरे यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या मागण्यांबाबत सविस्तर निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले होते. स्व. नागरे यांचे शेतीसंबंधी भावकीतील काही वाद कोर्टप्रकरण आहेत, ते वगळता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री कार्यालयाने श्रीमती स्वाती नागरे यांच्याकडून मुलांच्या शिक्षणासाठी ही मुले ज्या शाळा, कॉलेजमध्ये शिकत आहेत, त्यांना अदा करण्यासाठी फीचा तपशील मागितला होता. परंतु, तो त्यांनी अद्याप दिलेला नाही. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून श्रीमती स्वाती नागरे यांच्या परिस्थितीबाबत संवेदनशील असून, सकारात्मक आहेत. सरकारची त्यांना मदतीची भूमिका राहिलेली आहे. परंतु, श्रीमती स्वाती नागरे यांच्याकडून त्यांना तसा सकारात्मक प्रस्तावच पुढे जात नसल्याचे दिसून आले आहे. किंबहुना, त्यांना पुढे करून कुणी सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न करत आहे का? असा संशय आता निर्माण होऊ लागला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शेतकर्यांची दिशाभूल करण्यासाठी कुणी श्रीमती स्वाती नागरे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांना उपोषणाला बसविण्याचा घाट रचत आहे का? असा संशयही निर्माण होत असून, मुख्यमंत्री कार्यालय श्रीमती स्वाती नागरे यांच्या मुलांच्या शिक्षणाचे पालकत्व उचलण्यासाठी सकारात्मक असताना, त्यांच्या मागण्या वारंवार का बदलत आहेत? असाही प्रश्न निर्माण होत आहे.
————-
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केलेले हेच ते वृत्त…
सरकारचे आश्वासन वांझोटे ठरले!; श्रीमती स्वाती नागरे यांनी दिला प्राणांतिक उपोषणाचा इशारा!