– प्रकृती स्थीर; शिक्षकांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात घडली घटना
– गट शिक्षणाधिकारी यांच्यासमोरच घडला प्रकार; तातडीने वैद्यकीय उपचार मिळाल्याने वाचले प्राण!
चिखली (रंजना मोरे) : काल, दि. ३० जूनरोजी साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळेतील एक शिक्षक व एक शिक्षिका सेवानिवृत्त झाले. त्यामुळे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात सूत्रसंचलन करत असलेले सूत्रसंचालक तथा वक्ते प्रदीप मोरे या शिक्षकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची अॅन्जोप्लास्टी करण्यात आली. आता त्यांची तब्येत स्थीर आहे.
सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेले एक शिक्षक आणि एक शिक्षिका वयोमानानुसार काल, दि.३० जूनरोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे दोन्ही शिक्षकांनी मोठ्या थाटामाटात निरोप देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, माजी सभापती जाधव, शाळा समितीचे अध्यक्ष, सरपंच, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेवरील सहाय्यक शिक्षक प्रदीप मोरे हे जोरदारपणे करत होते. ते सूत्रसंचलन करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि ते अचानक खाली कोसळले. उपस्थित शिक्षकांनी आणि कर्मचार्यांनी त्यांना तात्काळ प्रथमोपचारासाठी गावातील रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती बिघडली असल्याने डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले. लगेच त्यांना बुलढाणा येथे रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या शरीरातीन दोन नळ्या ब्लॉकेज असल्याने त्यांचे ऑपरेशन करावे लागले. या घटनेमुळे शाळेतील वातावरण थोडे गंभीर झाल्याने शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी व जमलेले पालक चिंतेत होते. परंतु, आज रोजी त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे, असे शिक्षकाचे भाऊ माजी सभापती बाबुराव मोरे यांनी सांगितले.