– अमोना (ता. चिखली) येथील शेतकऱ्यांची ५० हजार रुपयांची फसवणूक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयात निवेदन सादर!
चिखली/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना गावातील संतोष जायभाये व इतर शेतकऱ्यांनी न्यूजीवुड सिड्स प्रा. लि. या खाजगी बी-बियाणे कंपनीविरुद्ध दि ३० जून रोजी गंभीर आरोप करत तालुका कृषी कार्यालयात निवेदन दिले आहे. कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना प्लॉट लागवडीसाठी प्रवृत्त केले, मात्र लागवडीअंती कोणतीही भरपाई न देता प्लॉट उपटून टाकण्याचे फर्मान काढले आहे, अशी तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनानुसार, या कंपनीच्या सांगण्यानुसार शेतकऱ्यांनी बी-बियाणे, ठिबक सिंचन, खत, मजुरी आदीसाठी अंदाजे ₹५०,०००/- खर्च केला आहे. मात्र काही दिवसांनंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी फोनवरून प्लॉट उपटण्यास सांगून पाठ फिरवली. झालेला खर्च भरून न देता कंपनीने फसवणूक केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांनी आपल्या निवेदनात तीन प्रमुख मागण्या मांडल्या आहेत: शेतकऱ्यांना झालेला अंदाजे ₹५०,०००/- खर्च कंपनीने भरून द्यावा,कंपनीच्या प्रतिनिधींवर फसवणुकीचा व फौजदारी गुन्हा दाखल करावा,मागण्या मान्य न झाल्यास शेकडो शेतकरी तालुका कृषी कार्यालयासमोर उपोषण करतील आणि त्यास जबाबदार प्रशासन असेल, असा इशारा दिला आहे. या निवेदनावर संतोष जायभाये यांच्यासह दिपक वाघ, संजय वाघ, सुमीत वाघ, समाधान वाघ, उध्दव ताठे, राज वाघ, गजानन जायभाये, राजू शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
शेतकऱ्यांचे हे निवेदन तहसीलदार, चिखली सिंदखेडराजा चेआमदार मनोज कायंदे व चिखली चे आमदार श्वेता ताई महाले यांना देण्यात आले आहे. या प्रकारामुळे तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून, शेतकऱ्यांची लुट करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.