– सक्षम व सुदृढ समाजासाठी व्यसनमुक्तीची गरज – ठाणेदार संदीप पाटील
बिबी (ऋषी दंदाले) – अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल जनतेला जागरूक करण्याच्या उद्देशाने जागतिक अमली पदार्थविरोधी दिन २६ जूनरोजी सर्वत्र साजरा केला जातो. त्याप्रमाणे बिबी पोलिस स्टेशन हद्दीत विद्यार्थ्यांना याबाबत जागृती व्हावी, याकरिता बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी सहकार विद्या मंदिर बिबी तसेच शिवाजी विद्यालय किनगावजट्टू येथे जाऊन विद्यार्थ्यांना अंमलीपदार्थ, त्याचे मानवी शारीरिक व मानसिक आरोग्यावरील घातक परिणाम, त्यातून निर्माण होणार्या सामाजिक व गुन्हेगारी समस्या याबाबत माहिती दिली.
अंमली पदार्थ्यांचे व इतर सर्वच व्यसनापासून दूर राहणे, कुटुंबातील कोणी याकडे वळत असेल, किंवा आहारी गेला असेल, त्याला याच्या वाईट परिणामांची जाणीव करून देणे अशा विविध मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बलशाली राष्ट्रासाठी सक्षम व सुदृढ नागरिक असणे महत्वाचे असून, त्याकरिता विद्यार्थी हे देशाचे भविष्य असल्याने त्यांना चांगल्या वाईटची जाणं करून देण्याच्या उद्देशाने आजच्या सारख्या कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले. तसेच एनडीपीएस कायद्याची माहिती देण्यात आली व या पदार्थांपासून दूर कसे राहावे, तसेच आपल्या प्रकृतीविषयी गंभीर राहण्याविषयी सावध केले. शैक्षणिक संस्थांबरोबरच इतर सेवाभावी संस्थाही या कामात पुढाकार घेत आहेत. यात आता सामान्य माणसांचाही सहभाग असणे गरजेचे आहे. याबाबत मत व्यक्त करून जागृती करण्यात आली.