चिखली (राजेश लोखंडे) – जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या सूचनेवरून चिखली पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्यावतीने शहरातील आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांना अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त अमली पदार्थापासून दूर राहण्याचे महत्व पटवून देण्यासाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे तसेच जनजागृती रॅलीचे काल, दि.२६ जूनरोजी आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक संग्राम पाटील, पोलिस उपनिरीक्षक शरद भागवतकर आणि संतोष जाधव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, अमली पदार्थाचे दुष्परिणाम आणि त्याचे आरोग्यावर तसेच भविष्यावर होणारे परिणाम तसेच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. चिखली पोलिस स्टेशनच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण होण्यास व अमली पदार्थाच्या विरोधात सजक राहण्याचा संदेश जनमाणसात पोहचण्यास मदत होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक वृंद, पोलिस अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष योगदान लाभले.