– निसर्ग कोपला मात्र काळ परीक्षेचा, चला सारे मिळून शेतकर्यांना धीर देऊ या; आमदार सिद्धार्थ खरात यांची साद!
– मेहकर तालुक्यातील नुकसानीची केली पाहणी; कॅनॉलच्या पाहणीसाठी तीन किलोमीटरची पायपीट!
मेहकर/बुलढाणा (बाळू वानखेडे) – गेल्या दोन दिवसाच्या पावसाने मेहकर तालुक्यात होत्याचे नव्हते झाले. यामध्ये तालुक्यातील २३ हजार हेक्टर जमिनीवरील पिकावर या कोसळधार पावसाने चक्क नांगर फिरवला. अचानक निसर्ग कोपल्याने आता काळ परीक्षेचा आहे. त्यामुळे आपण सगळे मिळून शेतकर्यांना साथ देऊ, असे आवाहन आमदार सिद्धार्थ खरात यांनी केले. पावसाने मेहकर तालुक्यातील झालेल्या नुकसानीची आज, दि.२७ जूनरोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ठीकठिकाणी शेतीबांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, यावेळी त्यांनी सदर आवाहन केले.
मेहकर तालुक्यात गेल्या दोन दिवसात पावसाने कहर केला. या पावसाने तालुक्यातील जवळजवळ २३ हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झाले, असे कृषी विभागाची प्राथमिक अंदाजित आकडेवारी सांगत असली तरी नुकसानीचा आकडा आणखी वाढणार आहे. या पावसाने पेरलेले बियाणे, पिके, फळबागा तसेच शेतीही मोठ्या प्रमाणात खरडून गेली. काही जीवितहानी झाली असून, घरातही पाणी शिरले. आधीच कर्जाच्या खाईत निचपत असलेला शेतकरी यामुळे पुन्हा घायाळ झाला आहे. सदर नुकसानीची आज, दि. २७ जूनरोजी आमदार सिद्धार्थ खरात यांनी ठीकठिकाणी पाहणी करून शेतकर्यांना धीर दिला तर शेतकरी चोहीकडून भरडला जात असून, आता नैसर्गही कोपल्याने त्याचा परीक्षेचा काळ आहे. त्यामुळे त्याला हातभार लावण्याची गरज असून, आपण शेतकर्यांसाठी एकीने काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी कर्मचारीसह इतरांना करत मात्र कामात कुचराई नको, हे सांगायलादेखील ते विसरले नाहीत. सर्वेक्षण करताना हात आखडता घेऊ नका, असेदेखील त्यांनी कर्मचार्यांना सूचित केले व तात्काळ वस्तुनिष्ठ नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले.
दरम्यान, आ.खरात यांनी आज, दि.२७ जूनरोजी दिवसभर सावत्रा, मोसंबेवाडी, जानेफळ, उटी, वरवंड, बोथा, देऊळगाव साखरशा, वागदेव, घाटबोरी, आंध्रुड, शेलगाव देशमुख, डोणगावसह इतर भागातील नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी केली. दरम्यान, पेनटाकळीच्या कॅनॉलने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आमदार खरात यांनी चक्क तीन किलोमीटरची पायपीटदेखील केली. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्करराव ठाकरे, शिवसेना (ठाकरे) उपजिल्हाप्रमुख आशीष राहाटे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेना (ठाकरे) तालुका प्रमुख निंबाजी पांडव, युवा सेना तालुकाप्रमुख आकाश घोडे, शहर प्रमुख किशोर गारोळे, देऊळगाव साखरशाचे सरपंच संदीप अल्हाट, माजी सरपंच सखाराम आमले, उटीचे माजी सरपंच संजय सुळकर, वसंता घायवट, गणेश धोटे, शे.युसुब, रामा ढवळे, शेख गुलाब, शिवसेना (ठाकरे) शाखाप्रमुख डिगांबर अल्हाट, तहसीलदार नीलेश मडके, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे, गट विकास अधिकारी दिनकर खरात, नायब तहसीलदार अजय पिंपरकर, मंडळ अधिकारी महाजन, कृषी विस्तार अधिकारी मेटांगळे, तलाठी बालाजी माने, सहाय्यक कृषी अधिकारी शिरसाट, ग्रामपंचायत अधिकारी बाळू म्हस्के, सागर गायकवाड, पंडित देशमुख, रमेश वानखडे, अमोल वानखडे, विकास वानखडे, दीपक गायकवाड, शेख राजीक, संजय नवत्रे, पिंटु वानखडे, मंगलदास वानखडे, गुलाबराव देशमुख, सुनील देशमुख, ज्ञानेश्वर पाचपोर तसेच संबंधित गावाचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उद्या मेहकर व लोणार तालुक्याच्या दौऱ्यावर!
बुलढाणा – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उद्या २८ जून रोजी लोणार व मेहकर तालुक्याचा दौरा करणार आहे. यादरम्यान ना. जाधव गेल्या दोन दिवसात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी काल व आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव उद्या २८ जून रोजी लोणार व मेहकर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. सकाळी १० वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होणार असून ,यादरम्यान लोणार तालुक्यातील सुलतानपूर ,अंजनी खुर्द, शारा, वेणी, गुंधा तसेच मेहकर तालुक्यातील अंत्री देशमुख, डोणगाव, गोहोगाव ,पांगरखेड, जनुना ,शेलगाव देशमुख, विश्वी,घाटबोरी या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची ना. प्रतापराव जाधव बांधावर जाऊन पाहणी करणार आहेत.यादरम्यान संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.तरी पक्ष पदाधिकारी व शेतकर्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.