– वडगाव तेजनजवळील भीषण घटना; जखमींमध्ये भाजपचे लोणार शहराध्यक्ष शुभम बनमेरूंसह दोघांचा समावेश!
लोणार (वाजिद खान) – धुव्वाधार पावसाने रस्त्यावर चिखल झाल्याने मेहकर – लोणार रस्त्यावरील वडगाव तेजनजवळ चारचाकी वाहन स्पील होऊन त्याने पाच पलट्या घेतल्या. या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाले आहेत. मृतक आणि जखमी चौघेही लोणारचे आहेत. ते मेहकरवरून लोणारकडे जात होते. ऋषभ बाबुलालजी बगडिया (२६, रा.लोणार) उर्फ बाळा असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असून, भाजप शहराध्यक्ष शुभम बनमेरू यांच्यासह तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मेहकर येथे उपचार सुरू आहे.
सविस्तर असे, की एमएच २८, बी. डब्ल्यू ०९५९ क्रमांकाच्या महिंद्रा कंपनीच्या चारचाकी वाहनाने चौघे मित्र मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास मेहकरवरून लोणारकडे जात होते. काल दिवसभर मेहकर – लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेतजमीन खरडून गेली. वडगाव तेजनजवळ शेतातील माती खरडून मुख्य रस्त्यावर आलेली होती. त्या मातीवर चारचाकी वाहन स्लीप झाले, गाडीने चार ते पाचवेळा पलट्या मारल्या. या अपघातात ऋषभ बाबुलालजी बगडिया याचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. अपघातग्रस्त युवकांना तातडीने मेहकर येथे हलवण्यात आले. अपघात एवढा भीषण होता, की वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. दरम्यान, एवढा मोठा वर्दळीचा रस्ता असताना आणि काल रात्री एवढा भीषण अपघात झालेला असतानादेखील रस्त्यावरचा चिखल यंत्रणेकडून आज दुपारपर्यंत हटवलेला नसल्याने अजूनही याठिकाणी दोनचाकी वाहनांचे लहान मोठे अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.