– वारंवार मागणी करूनही शिक्षक देण्यास चिखली गटशिक्षणाधिकार्यांची टाळाटाळ; गुंजाळा येथील पालक संतप्त!
चिखली (रंजना मोरे) – सातत्याने मागणी करुनदेखील शिक्षक न दिल्याने संतापलेल्या गुंजाळा येथील पालकांनी येत्या सोमवारी (दि.३०) चिखली येथील गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनातच सर्व विद्यार्थ्यांना आणून शाळा भरविणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे काल, दि.२४ जून रोजी दिला आहे.
चिखली तालुक्यातील गुंजाळा येथे जिल्हा परिषदची पहिली ते चौथीपर्यंत शाळा असलेल्या शाळेत ३१ विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळेवर दोन शिक्षकाची पदे मंजूर आहेत. मात्र मागील वर्षी मुख्याध्यापक असलेले इंगळे हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे शाळेवरील सहाय्यक शिक्षक असलेले पुरुषोत्तम पडघान यांना मोठी कसरत करीत दररोज चार वर्गातील विद्यार्थांना शिक्षण देण्यासाठी एका वर्ग खोलीत बसून शिक्षणाचे धडे द्यावे लागत आहेत. त्यातच गावातील पालकांच्या समस्या, शाळेचे टपाल, कार्यालयीन कामकाज यासारख्या कामात व्यस्त असल्याने दोन शिक्षकांची अंत्यत गरज आहे. मात्र एका शिक्षकामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी गटशिक्षण अधिकारी आर. आर. पाटील यांच्याकडे सातत्याने मागणी केली जात होती. परंतु अधिकार्यांनी पालकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त पालकांनी आक्रमक पवित्र घेत, शिक्षक द्या नाहीतर येत्या सोमवार, दिनांक ३० जूनरोजी पंचायत समितीच्या कार्यालयात विद्यार्थ्यांची शाळा भरवण्यात येईल, असे निवेदन पालकांनी गटशिक्षण अधिकारी यांना दिले. निवेदन देताना शाळा समितीचे अध्यक्ष नारायण केदार, उपाध्यक्ष सचिन गवई, युवराज खिल्लारे, सागर मोरे, रामप्रसाद केदार, बंडू इलग आदींची उपस्थिती होती. निवेदनावर सर्व सदस्यांच्या व पालकांच्या स्वाक्षर्या आहेत.
याबाबत गट शिक्षणाधिकारी आर. आर. पाटील यांना विचारले असता, त्यांनी सागितले की, लवकरात लवकर शिक्षक दिल्या जाईल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. परंतु शिक्षकाची नेमणूक करेपर्यंत पालकांनी सहकार्य करावे, असे त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.