– डोड्रा येथील धक्कादायक घटना; गावात शाेककळा
– सरकारच्या नाकर्त्या धोरणामुळे आणखी एका शेतकर्याचा बळी!
चिखली (रंजना मोरे) – सोयाबीन बियाणे उगवले नाही, आणि आद्रक बियाणे पावसात वाहून गेले. त्यामुळे नैराश्य आलेल्या व आता डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे याच्या चिंतेत बुडालेल्या ३६ वर्षीय कर्जबाजारी शेतकर्याने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना डोड्रा येथे आज (दि.२५) उघडकीस आली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत असून, सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणखी एका शेतकर्याचा बळी गेल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या डोड्रा येथील दत्तात्रय तुळशीराम पवार यांनी पोलिस स्टेशनला येवून लेखी जबाब दिला की, जनार्दन नारायण पवार (वय ३६) यांच्याकडे डोड्रा शिवारात दोन एकर जमीन आहे. या जमिनीवर त्यांनी देऊळगावमही येथील सेंट्रल बँकेकडून ५० हजार रुपये पीककर्ज घेतले होते. हे बँकेचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी यावर्षी शेतात एक एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र सोयाबीन बियाण्याची उगवण झाली नसल्याने ते दुबार पेरणीच्या तयारी करू लागले होते. त्याच बरोबर दि. २३ जूनरोजी मुसळधार पाऊस पडल्याने एका एकरातील आद्रक बियाणे वाहून गेले. आता बँकेचे कर्ज कसे फेडावे, आणि घराचा उदरनिर्वाह आणि मुलाच्या शिक्षणाचे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे राहिले. त्यामुळे ते घरात एकटे नैराश्यामध्ये राहू लागले. या नैराश्यामध्ये त्यांनी घरातील सर्व बाहेर गेल्याचे पाहून घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवून टाकली. या घटनेची माहिती अंढेरा ठाणेदार रुपेश शक्करगे यांना मिळताच तात्काळ बीट जमादार देढे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचासमक्ष पंचनामा करून मर्ग दाखल केला आहे. या घटनेमुळे घरातील कर्ता पुरुष गेल्याने आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी यांच्यावर फार मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून, गावकरी हळहळ व्यक्त करत आहेत.