– माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा काँग्रेसचा राजीनामा; १२ जूनरोजी हाती ‘घड्याळ ‘बांधणार!
– नियोजनासाठी आज बोलावली बैठक
– उपमुख्यमंत्री अजित पवारांसह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत खामगावात होणार पक्षप्रवेश सोहळा!
– ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वेळोवेळी प्रकाशित केलेले वृत्त खरे ठरले..!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जब तक जिंदा हू, काँग्रेस का परिंदा हू, असे छातीठोकपणे सांगणारे काँग्रेसचे खामगावचे तीन टर्म आमदार राहिलेले दिलीपकुमार सानंदा यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा अखेर राजीनामा दिला आहे. येत्या १२ जूनरोजी ते राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील काही मंत्रीगणांच्या प्रमुख उपस्थितीत खामगावात हा शानदार पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्याबाबतच्या नियोजनासाठी आज, दि. ५ जूनरोजी खामगाव येथील जुने विश्रामभवन येथे पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या राजकीय हालचालीवर बारीक लक्ष ठेवत, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने या अगोदर वेळोवेळी वृत्तदेखील प्रकाशित केले होते. या निमित्ताने काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना स्वतःच्या जिल्ह्यातच मोठा धक्का बसणार आहे.

माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे तब्बल तीनवेळा खामगावचे काँग्रेसचे आमदार राहिले आहेत. शिस्तप्रिय व हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. परंतु, गेल्या काही महिन्यापासून ते काँग्रेसमध्ये नाराज व एकाकी पडल्याची चर्चा वेळोवेळी ऐकावयास मिळत होत्या. याचदरम्यान त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटसुद्धा घेतली होती. शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्या बाबतच्या मध्यंतरी चर्चासुद्धा कानावर आल्या होत्या. परंतु या प्रवेशाला खामगावतील भाजपाचे मंत्री आकाश फुंडकर यांचा जोरदार विरोध असल्याचे सांगितले जात होते. यानंतर त्यांनी पालकमंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज कायंदे, जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या माध्यमातून अजित पवार यांच्याशी संपर्क साधला. प्रथम त्यांनी आपल्या काही सहकार्यांना राष्ट्रवादी अजित पवार गटात पाठवले. दिलीपकुमार सानंदा हे काँग्रेस सोडतील हे कोणालाही शक्य वाटत नव्हते, परंतु राजकारणात अशक्यही काहीच नाही. त्यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वाचा ३१ मेरोजी राजीनामा दिला आहे. येत्या १२ जूनरोजी दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती पक्षाच्या विश्वसनीय सूत्रांकडून समजली असून, यासाठी खामगाव येथे भल्या मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. पक्षप्रवेश सोहळयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्रीगणसुद्धा उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी २५ हजार घड्याळी तसेच छत्र्यांचेसुद्धा वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे.
या कार्यक्रमाचे नियोजनासाठी आज, ५ मेरोजी दुपारी १ वाजता बाजार समिती सभापती सुभाष पेसोडे यांनी खामगाव येथील जुने शासकीय विश्रामभवन येथे एका बैठकीचेसुद्धा आयोजन केले आहे. यावेळी पक्षाचे अमरावती विभागाचे समन्वयक तथा आमदार संजय खोडके, आमदार मनोज कायंदे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, आमदार दिलीपकुमार सानंदा यांचेसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार असल्याने, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना हा स्वजिल्ह्यातच मोठा धक्का बसणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे राज्यात विविध जिल्ह्यात पक्षीय कार्यक्रम सुरू असले तरी, जिल्ह्यात मात्र काँग्रेस काहीशी खिळखिळी होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने यापूर्वी प्रसिद्ध केलेले हेच ते वृत्त…
जूनमध्ये माजी आ. दिलीप सानंदांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित?