– वरिष्ठ पातळीवरील बोलणी अंतिम टप्प्यात; अजित पवारांच्या उपस्थितीत खामगावात प्रवेश सोहळा शक्य?
– पक्षप्रवेशाच्यावेळी २५ हजार घड्याळी वाटल्या जाण्याची शक्यता!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – काँग्रेसचे माजी आमदार तथा सद्या पक्षात अडगळीत पडलेले ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झाला असून, जून महिन्यात हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठस्तरीय सूत्रानेदेखील या माहितीला दुजोरा दिला. त्यांच्या काही शिलेदारांनी या अगोदरच ‘राष्ट्रवादी’त प्रवेश केला आहे. पक्षनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सानंदा यांच्यातील बोलणी अंतिम टप्प्यात आली असून, खामगावातच हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे या राजकीय सूत्राने सांगितले. या सोहळ्यात सानंदा हे २५ हजार घड्याळी वाटणार असल्याचेही सानंदा यांच्या निकवर्तीयांनी सांगितले. विशेष म्हणजे, सानंदा यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला राष्ट्रवादीत आणण्याची जबाबदारी सिंदखेडराजाचे आमदार मनाेज कायंदे हे पार पाडत असून, जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी आ. कायंदे यांनी शांतपणे राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे.
तीन टर्म माजी आमदार राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीपकुमार सानंदा हे पक्षात सद्या अडगळीत पडलेले आहेत. त्यांनी अलिकडेच महायुतीत प्रवेशाची तयारी दर्शविली होती. परंतु, सानंदा यांच्या रूपाने ‘राजकीय सवत’ महायुतीत आणण्यात कॅबिनेट मंत्री तथा भाजपचे खामगावचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी तीव्र विरोध केला होता. त्यामुळे त्यांचा शिंदे गटात व भाजपात प्रवेश होऊ शकला नव्हता. त्यानंतर सानंदा यांनी अजित पवार गटाकडे आपला मोर्चा वळवला. अजितदादा यांच्यासोबत त्यांची सिंदखेडराजाचे आमदार मनोज कायंदे व पालकमंत्री मकरंदआबा पाटील यांच्या माध्यमातून भेट झाली व चर्चादेखील झाली आहे. ही चर्चा आता अंतिम टप्प्यात आली असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी त्यांना पक्षात येण्याची सूचना अजितदादांनी केली असल्याचे या राजकीय सूत्राने स्पष्ट केले.
अजितदादांचे सद्या विदर्भावर लक्ष असून, याबाबतचे सविस्तर वृत्त नुकतेच ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने दिले होते. त्यानुसार, जून महिन्याच्या दुसर्या आठवड्यात सानंदा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, तसा मोठा कार्यक्रम खामगावात घेतला जाणार आहे. या कार्यक्रमात सानंदा यांच्यासोबत अनेक काँग्रेस पदाधिकारी व नेतेदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात सानंदा हे २५ हजार घड्याळींचे वाटप करतील, असेही त्यांच्या निकटवर्तीय सूत्राने सांगितले आहे.
———–