– ठेकेदारावर कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा; अन्यथा ‘शिवसंग्राम’च्यावतीने 10 जूनपासून तीव्र आंदोलन – भगवानराव लंबे
चिखली (राजेश लोखंडे) – माळखेड ते हिवरखेड रस्त्याचे काम गेल्या एका वर्षापासून ठेकेदाराच्या हलगर्जीने रखडले असून, त्यामुळे परिसरातील गावांत तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. या कामासाठी आमदार निधीतून रक्कम मंजूर झालेली असूनसुद्धा सदर काम पूर्ण केले जात नाही. रस्त्याचे व डांबरीकरणाचे काम तत्काळ करण्यात यावे, अन्यथा १० जूनपासून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव लंबे पाटील व ग्रामस्थांच्यावतीने ठेकेदार व बांधकाम विभाग यांना देण्यात आला आहे.
माळखेड ते हिवरखेड रस्ताच्या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन वर्ष होत आले आहे. परंतु अद्यापही या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले नाही, तसेच रुंदीकरणासह डांबरीकरणाचे कामसुद्धा अतिशय संथगतीने सुरू आहे. खराब व खड्डेमय झालेल्या रस्त्यामुळे वाहनधारकांसह तसेच रस्त्यालगतचे शेतकरी व रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेमुळे व पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला असून, नागरिकांची गैरसोय व अपघात होत आहेत. त्यामुळे सदर रस्त्याच्या कामाची गती वाढवण्यात यावी, तसेच माळखेड ते हिवरखेड रस्ता डांबरीकरणाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अन्यथा १० जूनपासून शिवसंग्राम पक्ष व ग्रामस्थांच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसेच सदर कामाच्या गुणवत्तेत शंका येत असल्याने या कामाचे शासकीय त्रयस्थ संस्थेकडून परीक्षण करण्यात येऊन, संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही शिवसंग्राम पक्षाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भगवानराव लंबे पाटील व ग्रामस्थांनी दिला आहे.
————–