– शिवश्री पुरूषोत्तम खेडेकर, बाळासाहेब थोरात यांच्यानंतर शेणफडराव घुबे यांच्याकडून लग्न समारंभाच्या आचारसंहितेचे स्वागत!
– राज्यात सीबीएसई पॅटर्न राबविणे, झेडपी शाळांच्या प्रवेशासाठी घरपट्टी, पाणीपट्टी माफ करणे हे राजकीय षडयंत्र – शेणफडराव घुबे
देऊळगाव घुबे, ता. चिखली (राजेंद्र घुबे) – लग्न वर्हाड व लग्न खर्चासंदर्भात अहिल्यानगर येथील मराठा समाजाने आचारसंहिता तयार करून ती लागू केल्यानंतर कमी खर्च व कमी बडेजावात लग्न लावण्याचे मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर यांच्यासह ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीदेखील जोरदार समर्थन केल्यानंतर या आचारसंहितेचे शेतकरी नेते तथा शिक्षण संस्थाचालक शेणफडराव घुबे यांनीदेखील जोरदार स्वागत केले आहे. प्री वेडिंग, डीजे व नाचगाण्याचा धुमाकूळ, ऑकेस्ट्रा व हळद समारंभाचे अतिरंजित आयोजन ह्या बाबी मराठा समाजासाठी व विशेषतः शेतकरीवर्गासाठी विनाशाकडे नेणार्या असून, लग्नाची वेळसुद्धा सकाळी ११ ते १ या दरम्यान असावी. फळ भरणे, पाय धुणावळ व इतर अनावश्यक बाबी टाळून वेळ वाचविणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना केले.

‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी संवाद साधताना ज्येष्ठ शेतकरी नेते शेणफडराव घुबे यांनी विविध विषयांवर सविस्तर मत व्यक्त केले. ते म्हणाले, की लग्न समारंभानिमित्त एंगेजमेंट, कुंकू -टिळे, हे कार्यक्रम दोनदोनदा केल्यापेक्षा कुंकुम तिलक व लग्नसमारंभ एकदाच उरकून घेतल्यास अनेकांचा वेळ वाचू शकतो. अनेक महत्वाचे लोक, उदा. डॉक्टर, इंजिनिअर, वकील, न्यायाधीश, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, व अनेक गुणवंत लोकांना अशा प्रसंगी नाईलाजाने उपस्थित रहावे लागते. अशा लोकांना त्यांचे कार्यातून परावृत्त करण्यापेक्षा ब्राम्हणाकडून पंचागातून तिथी काढून रात्री बेरात्री १० वाजता लग्न लावल्यापेक्षा सुटीच्या दिवशी सकाळी ११ ते १.०० या वेळेत लग्न समारंभ आयोजित करून मोजक्याच नातेवाईकामधे लग्न समारंभ ऊरकने ही काळाची गरज आहे. मराठा बांधवांनी विशेषत: शेतकरी व बहुजन समाज बांधवांनी लग्न समारंभ, हळद व प्री-वेडिंग तसेच डीजे, ऑकेस्ट्रा व इतर अनावश्यक खर्च टाळून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. आपली मुले डीजेच्या आणि विशेषतः महापुरूषांच्या जयंती उत्सवाच्या नादी लागून व्यसनाधीन होत आहेत. हे सर्व करण्यामागे राजकारणी, वेगवेगळे काळे धंदे करणारे व्यवसाईक, व इतर कांही छुप्या घटकांचा छुपा हात आहे. आपल्या आयुष्याची माती होत आहे हे तरूणाईच्या लक्षात न आल्यामुळे कित्येक तरूण व्यसनाधीन होऊन त्यांचे व त्यांच्या कुटुबांचेही जीवन अस्ताव्यस्त झाल्याची प्रत्येक गांवात उदाहरणे आहेत. या स्पर्धेच्या युगात आपली मुले स्पर्धेमधे टिकावी म्हणून पालकांनी विशेष जागरूक राहणे गरजेचे आहे, असेही शेणफडराव घुबे म्हणाले.
शिक्षण क्षेत्रात सर्वत्र गोंधळ सुरू आहे. शिक्षणाचा खेळखंडोबा शासनाने सुरु केला आहे. कारण ‘ दादासाहेब तुम आगे बढो, भाऊसाहेब तुम आगे बढो, ताईसाहेब तुम आगे बढो.. हम तुम्हारे साथ हैं!’ असे म्हणून उड्या मारणारी व दारु पिऊन धुडगूस घालणारी बेकारांची फौज त्यांना निर्माण करायची आहे, असे सांगून श्री घुबे पुढे म्हणाले, की जिल्हा परिषदेच्या शाळेत सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू करण्याची घोषणा हा त्यातलाच भाग आहे. पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत दोन किंवा तीन शिक्षक कार्यरत असतांना सीबीएसईचा अभ्यासक्रम कसा शिकविणार? सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम शिकविण्याच्या पात्रतेचे शिक्षकसुद्धा जिथे उपलब्ध नाहीत, तेथे सीबीएसईचा अभ्यासक्रम राबविण्याचे नवं फॅड हे राजकारण्यांचच सोंग आहे. एका आमदाराचा किंवा खासदारांचा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याचं दाखवा अन् दहा हजार रुपये बक्षीस मिळवा, हे माझं आव्हान आहे. तांदूळ फुकट, कपडे फुकट, पुस्तके फुकट असे कार्यक्रम राबवून केवळ मागासवर्गीयांची व गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत सडविण्याचे काम सुरु आहे. आता काही ग्रामपंचायतींनी घरपट्टी माफ व ईलेक्ट्रिक बिल माफ अशा घोषणा सुरु केल्या आहेत. हासुद्धा राजकारणाचाच एक भाग आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली व कोचिंग क्लासच्या नावाखाली जनतेची लूट सुरु आहे. नियमित वर्गात राहून शिक्षकांच्या सान्निध्यात शिक्षण घेणे व ऑनलाईन किंवा कोचिंग क्लासमध्ये शिक्षण घेणे यामधे जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे आपली मुले शिक्षकांच्या सान्निध्यात राहून कशी घडतील, या बाबतीत पालकांनी जागरुक राहणे ही नितांत गरज आहे. विद्यार्थी घडण्याचे किंवा बिघडण्याचे १६ ते १८ हेच वय महत्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी या वयात आपल्या मुलांना लग्नसमारंभात किंवा काही महत्वाचे सण उदा. दहीहंडी, गणपती उत्सवातील किंवा दुर्गादेवींचे रात्रीचे कार्यक्रम, कावडीच्या कार्यक्रमांतील पायीवार्या अशा अनावश्यक बाबींपासून दूर ठेवून वाचनालय, अभ्यासिका अशा महत्वाच्या करिअर घडविणार्या बाबींकडे वळवावे. मी सूचविलेल्या वरील महत्वाच्या बाबी लक्षात घेऊन मुलांकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास अनेक पिढ्या बरबाद तर होतीलच, परंतु, सामाजिक ऐक्य, सामाजिक बांधिलकी व कौटुंबीक आपभाव नष्ट होण्याचाही धोका आहे. हा धोका ओळखून पालकांनी जागरूक रहावे, अशी सूचनाही शेतकरी नेते तथा शिक्षण संस्था चालक शेणफडराव घुबे यांनी केली आहे.
पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत दोन किंवा तीन शिक्षक कार्यरत असतांना सीबीएसईचा अभ्यासक्रम कसा शिकविणार? सेमी इंग्रजीचा अभ्यासक्रम शिकविण्याच्या पात्रतेचे शिक्षकसुद्धा जिथे उपलब्ध नाहीत, तेथे सीबीएसईचा अभ्यासक्रम राबविण्याचे नवं फॅड हे राजकारण्यांचच सोंग आहे. एका आमदाराचा किंवा खासदारांचा मुलगा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असल्याचं दाखवा अन् दहा हजार रुपये बक्षीस मिळवा, हे माझं आव्हान आहे. तांदूळ फुकट, कपडे फुकट, पुस्तके फुकट असे कार्यक्रम राबवून केवळ मागासवर्गीयांची व गरिबांची मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत सडविण्याचे काम सुरु आहे. आता काही ग्रामपंचायतींनी घरपट्टी माफ व ईलेक्ट्रिक बिल माफ अशा घोषणा सुरु केल्या आहेत. हासुद्धा राजकारणाचाच एक भाग आहे.
– शेणफडराव घुबे, ज्येष्ठ शेतकरी नेते, शैक्षणिक संस्थाचालक