– आमदार मनोज कायंदे यांनी लक्ष घालण्याची गरज; ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष!
– तब्बल सात गावांतील ग्रामस्थांच्या नशिबी भर पावसाळ्यात मरणयातना!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या अवघ्या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली असून, हा रस्ता आहे की नागाटी? अशा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. रस्त्याचे सद्या काम संथगतीने चालू असून, या मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी तातडीने या रस्त्याच्या कामात लक्ष घालावे, अशी मागणी या परिसरातील गावांतून होत आहे. या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार एका वजनदार राजकीय नेत्याच्या जवळचा असून, तो मनमानी करत आहे. आधीच या रस्त्यावरून वाळूतस्करांची वाहने बेफाम धावत आहे, त्यातच रस्त्याची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे, त्यामुळे या भागातील मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, पिंपळवाडी, मंगरूळ, अमोना, कोनड या गावांतील ग्रामस्थांना अक्षरशः पायी चालणेदेखील कठीण झाले असून, धड रस्त्याअभावी मरण यातना सोसाव्या लागत आहेत.
दरम्यान, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने प्रसारित केलेल्या बातमीची सिंदखेडराजा-देऊळगावराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी तातडीने दखल घेतली असून, त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांना आदेश देऊन घटनास्थळी पाठवले हाेते. देऊळगावराजा उपविभागाच्या अभियंत्यांनी या रस्त्याची पाहणी करून ठेकेदाराला हा रस्ता तातडीने दुरूस्त व पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.
गेल्या आठवडाभरात या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे देऊळगाव घुबे ते शेळगाव आटोळ या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यावरील खड्डे, माती व मुरूम यामुळे रस्त्याची अक्षरशः नागाटी झाली असून, रस्ता चिखलमय झालेला आहे. कोणतेही वाहन या रस्त्याने नेणे शक्य नाही, अशी दुर्देवी परिस्थिती आहे. मोटारसायकलस्वारांना तर जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून, दररोज छोटे मोठे अपघात घडत आहे. चारचाकी गाडी, ट्रॅक्टर हे वारंवार फसत असल्याने शेतकरी, वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत. एकीकडे रस्ता प्रचंड खराब झाला असताना, दुसरीकडे वाळूतस्करांचे अवजड डंपर मात्र या रस्त्यावरून धावतच असल्याने या रस्त्याची प्रचंड दयनीय अवस्था बनली आहे. दररोज रात्रंदिवस सुमारे ६० ते ७० डंपर खुलेआम या रस्त्यावरून धावत असून, तहसीलदारांचे पथक केवळ नावाला उरले आहे.
- या रस्त्याची सद्या इतकी दयनीय अवस्था झाली आहे, की या रस्त्याने दुचाकीवरचा प्रवास हा जीवघेणा बनला आहे. मिसाळवाडीजवळील ओढ्याजवळ रस्ता जीवघेणा बनला असून, एसटी महामंडळाच्या गाड्यादेखील इकडे जाऊ शकत नाही. त्यामुळे या मार्गावरील बसदेखील कमी करण्यात आल्या आहेत. रस्त्याअभावी या भागांतील ग्रामस्थांना अतोनात त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
- या रस्त्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डाॅ. विकास मिसाळ यांनी वारंवार पाठपुरावा करून माजी आमदार तथा तत्कालीन पालकमंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडून काेट्यवधी रूपयांचा निधी आणला हाेता. परंतु, कंत्राट मिळवूनदेखील ठेकेदाराने या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालवलेले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ व सरपंच पुन्हा एकदा तीव्र आंदाेलनाच्या तयारीत आहेत.

तातडीने रस्त्याची दुरूस्ती करून काम पूर्ण करा, अन्यथा तीव्र आंदाेलन – सरपंच सतिश पाटील भुतेकर
सार्वजनिक बांधकाम विभाग देऊळगावराजा यांनी तातडीने हा रस्ता पूर्ण करावा, व जेथे हा रस्ता उखडला गेला आहे, तेथील काम लगेचच पूर्ण करून द्यावे. ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ हा रस्ता पूर्ण करण्यासाठी लागत असून, ऐन पावसाळ्यात या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने या परिसरातील गावांतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या रस्त्याने जाणे-येणे करावे लागत आहे. चिखली किंवा इकडे मेरा हायवेला जाण्यासाठी दुसरा पर्यायी रस्ता नाही. दररोज शेकडो विद्यार्थ्यांना याच रस्त्याने जावे लागते. तेव्हा, हा रस्ता जर तातडीने दुरूस्त करून दिला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा इसरूळचे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतिश पाटील भुतेकर यांनी दिला आहे.