– शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढले; सरनाईक यांच्या आंदोलनामुळे शेतकर्यांना दिलासा
– होल्ड लावणार्या बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत आदेश
चिखली (राजेश लोखंडे) – शेतकर्यांच्या खात्यांना होल्ड लावल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असे स्पष्ट आदेश देऊनही जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या आदेशाला धाब्यावर बसविणार्या बँकांना क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी तालुक्यातील एकलारा येथील इंडियन ओव्हरसीज बँकेंत ठिय्या आंदोलन करून वठणीवर आणले. जिल्हाधिकार्यांनीदेखील बँकर्सची बैठक घेऊन शेतकर्यांप्रती गैरवर्तवणूक खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट करत, दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचे ठणकावले. त्यानंतर बँकांनी होल्ड हटविण्याची कार्यवाही सुरू केली होती.
सविस्तर असे, की या संदर्भात शेतकर्याने २१ मेरोजी कर्ज खात्यात जमा झालेली रक्कम बचत खात्यात वळती करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे पत्र घेऊन आज शेतकरी बँकेत गेले होते. मात्र बँक व्यवस्थापक यांनी कर्ज नवे – जुने करण्याचा तगादा शेतकर्यांना लावल्याने या बाबतची माहिती शेतकर्यांनी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना दिली. त्यामुळे सरनाईक यांनी तातडीने एकलारा येथे इंडियन ओव्हरसीज बँक गाठून बँक व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. मात्र जिल्हाधिकारी यांचे पत्र असूनदेखील बँक व्यवस्थापक जुमानत नसल्याचे दिसून आल्याने आक्रमक भूमिका घेत, बँकेतच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.
यावेळी सक्तीची वसुली थांबविण्यात यावी, हक्काची रक्कम परस्पर कपात करण्यात येवू नये, शेतकर्यांच्या खात्याला लावलेले होल्ड काढण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत शेतकर्यांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत बँकेतील आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका विनायक सरनाईक यांनी घेतली होती. याबाबत सरनाईक यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क केला असता, बँका आपलेही आदेश जुमानत नाही, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर बँकांवर गुन्हे दाखल केले जातील, अशी तंबी जिल्हाधिकारी यांनी बँकांना भरली. त्यामुळे इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार होल्ड काढण्याची कार्यवाही सुरू केली. त्यामुळे शेतकरी नेते विनायक सरनाईक यांच्यासह शेतकर्यांनी आपले ठिय्या आंदोलन मागे घेतले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दि. २७ मेरोजी शासकीय मदतीला होल्ड लावण्यात येवू नये, पीकविम्याच्या रकमेला होल्ड लावू नये, कुठल्याही प्रकारे सक्तीने वसुली करु नये, असे स्पष्ट निर्देश क्षेत्रीय प्रबंधक व सर्व बँक जिल्हा समन्वयक यांना दिले आहेत, असे असतांनादेखील जिल्ह्यातील बँकांकडून शेतकर्यांकडून सक्तीची वसुली होत आहे. त्यामुळे यापुढे बँक व्यवस्थापकांनवर जिल्हाधिकारी यांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी दिला आहे.