– खामगाव तालुक्यातील घारोड गावातील दुर्देवी घटना
– शेगाव तालुक्यालाही पावसाने झोडपले; अनेक गावे अंधारात!
खामगाव/शेगाव (तालुका प्रतिनिधी) – खामगाव व शेगाव तालुक्यांना काल रात्री मुसळधार पावसाने झोडपले असून, काल रात्रीच्या सुमारास खामगाव तालुक्यातील घारोड येथील नदीला आलेल्या पुरात ७०वर्षीय शेतकरी वाहून गेले आहेत. शेतातून घरी येत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. या दुर्देवी घटनेत त्यांचा पुतण्या मात्र सुदैवाने बचावला आहे. वाहून गेलेल्या शेतकर्याचा प्रशासन शोध घेत होते. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा, पारखेड, नायगाव देशमुख, वरवंड, मेहकर शहरासह बरेच ठिकाणी रात्रभर धो धो पाऊस बरसला.
गेल्या सात दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत असून, काल सायंकाळी खामगाव व शेगाव तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. घारोड परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसाने घारोड नदीला पूर आल्याने शेतातून घरी येत असताना दुचाकीद्वारे घारोड ते अकोलीमधील नाल्यावरून येत असताना धोंडूजी भगवान इंगळे (वय ७०) हे वाहून गेले तर पोहता येत असल्याने त्यांचा पुतण्या राहुल मधुकर इंगळे हा बचावला आहे. दुचाकी व त्यांचे धोतर सापडले असून, अद्याप त्यांचा मृतदेह हाती आला नव्हता.
याबाबत तहसीलदार सुनील पाटील यांच्यासह खामगाव महसूल विभागाचे पथक मदत व बचाव कार्य करत होते. पोलिस आणि एनडीआरएफच्या पथकाच्या सहाय्याने मृतदेहाचा नदीपात्रात शोध घेतला जात होता.
मंगळवारी शेगाव तालुक्यालादेखील पावसाने चांगलेच झोडपले असून, शेगाव ते वरवट बकाल मार्गावर झाडे पडल्याने ठप्प पडला होता. कालखेड, मनसगाव, आडसूळ, झाडेगाव, येऊलखेडा येथे जोरदार पावसाने हाहाकार उडविला होता. काल रात्रीपासून वीज गुल झाली असून, अनेक गावे अंधारात होती.