– गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीवर खामगाव येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू!
– पिंपळगावराजा येथील संतापजनक प्रकार; संतप्त जमाव पोलिस ठाण्यावर धडकला
– पळून गेलेल्या नराधमाच्या नांदुरा येथून मुसक्या आवळल्या!
खामगाव/बुलढाणा (राजेश लोखंडे) – आई नसलेल्या व वडिल मोलमजुरी करणार्या एका अवघ्या साडेनऊ वर्षांच्या गरीब चिमुरडीवर रेहान खान मुक्तार खान (वय २४) या नराधमाने पाशवी लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक व संतापजनक प्रकार खामगाव तालुक्यातील पिंपळगावराजा येथील पेठापुरा परिसरात उघडकीस आला. या नराधमाने ५० रूपये देऊन खाऊचे आमिष दाखवले व चिकन सेंटरमध्ये नेऊन तिचे लचके तोडले. ही मुलगी सद्या अत्यवस्थ असून, तिच्यावर खामगाव येथे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पळून गेलेल्या या नराधमाच्या पोलिसांनी नांदुरा येथून मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपळगावराजा येथील चिकन सेंटर चालविणारा आरोपी रेहान खान याने याच पेठपुरा भागात राहणारी साडेनऊ वर्षीय मुलगी किराणा दुकानावर अंडे घेण्यासाठी आली असता, आरोपीने ५० रूपयांची नोट दाखवून बालिकेला चिकन सेंटरच्या दुकानात बोलाविले व तिच्यावर बळजबरीने अमानुष लैंगिक अत्याचार केला. यावेळी मुलगी गंभीररित्या जखमी झाली होती. सदर घडलेला प्रकार पीडितेने तिच्या नातेवाईकांना सांगितला. यावरून नातेवाईकांनी तातडीने पिंपळगावराजा पोलिस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दिली. आरोपी आणि पीडित चिमुकली एकाच समाजाचे असून, काही वेळातच सदर बाब वार्यासारखी परिसरात पसरली. नागरिकांनी तातडीने पिंपळगावराजा पोलिस स्टेशन गाठून सदर आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली. पिंपळगावराजा पोलिस स्टेशनवर सातशे ते आठशे लोकांचा जमाव जमला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
जमावाचा संताप पाहाता, पोलिस उपयुक्तांनी तातडीने आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पीडितेला उपचारासाठी सामान्य रुग्णालय खामगाव येथे पाठविले. तसेच, दोन विशेष तपास पथके नेमून आरोपीला नांदुरा तालुक्यातील वसाडी येथून अटक केली. पीडित मुलीला आई नसून, वडील मोलमजुरीचे काम करतात. सद्या या चिमुकलीला खामगाव येथील सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आलेले असून, तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.