– भेंडवळ घटमांडणीचे भाकित : देशावर आर्थिक मंदीचे सावट राहणार!
– जूनमध्ये साधारण, जुलैत भरपूर, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस
भेंडवळ, ता. जळगाव जामोद (जिल्हा प्रतिनिधी) – पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर तणावपूर्ण बनलेले भारत व पाकिस्तानचे संबंध पाहाता, आणि पाकिस्तानविरोधात युद्ध पुकारून केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार हे आपल्या नागरिकांच्या हत्येचा बदला घेईल, असे बोलले जात असताना, हे युद्ध होणार नाही. देशात तणाव मात्र कायम राहील, राजा तणावात राहील, असे भाकित प्रसिद्ध भेंडवळ येथील घटमांडणीतून वर्तविण्यात आले आहे. यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पडणार असून, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल. या वर्षी पीकपाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर आदी पिकांचा समावेश असेल. शेतमालाला भाव मिळणार नाही, त्यामुळे मंदीचे सावट असेल, असा अंदाज या घटमांडणीमध्ये सारंगधर महाराज यांनी व्यक्त केला आहे.
बुलढाणा जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातील हजारो शेतकरी, नागरिकांचे लक्ष वेधलेल्या भेंडवळ येथील घटमांडणीचे बहुप्रतीक्षित भाकीत आज (दि.१ मेरोजी) वर्तविण्यात आले. हभप चंद्रभान महाराज यांचे वंशज असलेले सारंगधर महाराज व पुंजाजी महाराज यांनी आज घटमांडणी स्थळाचे व घट, त्यातील पदार्थ, धान्याची स्थिती लक्षात घेऊन हे भाकीत जाहीर केले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यासह जळगाव खान्देश व सीमावर्ती मध्यप्रदेशमधील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. काल अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नरहरी शिवराम वाघ यांच्या शेतात घटमांडणी करण्यात आली होती. मांडलेल्या या घटमांडणीत रात्रीतून नैसर्गिकरीत्या झालेल्या बदलांवर आधारित हे भाकीत असते. या भाकिताच्या आधारेच शेतकरी खरिप, रब्बी पिकांचे नियोजन करतात. यावेळी साधारण पीक पाण्याचे भाकित वर्तविण्यात आले. देशाची आर्थिकस्थिती बिकट राहील, यामुळे व युद्धजन्यस्थितीमुळे ‘राजा’वर (पंतप्रधान) तणावात राहील. देशात परकियांचा त्रास वाढणार, प्रलयाची भीती, मंदीचे सावट राहील. शेजारी राष्ट्रासोबत युद्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण युद्ध झालेच तर तिसर्या महायुद्धासारखे होईल, असे इशारावजा भाकित सारंगधर महाराजांनी वर्तविले. आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये वापरात असलेल्या वस्तूंपासून घटमांडणी केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी जळगाव जामोद तालुक्यातील गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे, त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसर्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते.
वर्तविण्यात आलेले अंदाज…
– या वर्षी पीकपाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद, मूग, ज्वारी, तूर.
– शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल.
– यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्टमध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबरमध्ये भरपूर पाऊस असेल.
– यंदा देशात नैसर्गिक संकटे जसे पूर, भूकंप, युद्धजन्य आपत्तीचे प्रमाण जास्त असेल.
– देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल.
– राजा कायम असेल पण कायम तणावात असेल.
– यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल.
– परकीय शत्रूपासून मोठा त्रास वाढणार आहे.
पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यात कमी पाऊस, नंतरच्या तीन महिन्यात पाऊस चांगला राहील. तसेच भरपूर अवकाळी पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकर्यांनी पहिल्या महिन्यात पेरण्यांची घाई करू नये, असा सल्ला यावेळी देण्यात आला. यंदा पिकांचे प्रमाण सर्वसाधारण राहणार असून, पिकाच्या नासाड़ीचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. धोकादायक बाब म्हणजे, यंदा देशात रोगराईचे प्रमाण जास्त राहणार असल्याचे म्हटले आहे. पिकाबाबत केलेल्या भाकितांमध्ये गहू, ज्वारी, तांदूळ आणि इतर पिके सर्वसाधारण मोघम स्वरूपाचे सांगण्यात आली आहे. याशिवाय, पाकिस्तानसोबत सुरू असलेले शाब्दिक युद्ध खरोखरच्या युद्धामध्ये बदलण्याची शक्यता कमी आहे. मात्र युद्ध झाल्यास तर या वेळेस महायुद्ध होईल, असे सांगण्यात आले.