– जिल्हाधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात दिवसभर शोधमोहीम
– प्रशासनाच्या धडक कारवाईसत्राने वाळूतस्करांचे धाबे दणाणले!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा धरण परिसरातील अवैध रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने आज (दि.१ मे) सकाळपासूनच मोठे कारवाईसत्र राबवले. जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा प्रा. संजय खडसे यांच्या नेतृत्वात व उपस्थितीत ही मोहीम पार पडली. तहसील कार्यालय देऊळगावराजा, जिल्हा शोध व बचाव कार्य पथक आणि खडकपूर्णा विभागाच्या पथकाने संयुक्तपणे दिवसभर शोधमोहीम राबवून वाळूतस्करांना सळो की पळो करून सोडले. या मोहिमेदरम्यान धरणकाठावर एक इंजिन बोट आढळून आली, जी जलाशयातून जेसीबीच्या साहाय्याने बाहेर काढून तात्काळ नष्ट करण्यात आली. तसेच, परिसरातील पाच ते सहा ठिकाणी आढळलेले अवैध रेती उपशासाठी वापरले जाणारे सक्सन पाईप्स, ड्रम्स व अन्य साहित्यदेखील जाहीरपणे नष्ट करण्यात आले.
आजची महसूल विभागाची कारवाई धरण परिसरात बेकायदेशीर व्यवसाय करणार्यांना स्पष्ट इशारा देणारी ठरली आहे. या मोहीमेत तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार सायली जाधव, तलाठी कृष्णा खरात, संजय हांडे, परमेश्वर बुरकुल, तसेच कोतवाल विठ्ठल हरणे व शरद काकडे सहभागी झाले होते. खडकपूर्णा विभागाचे श्री. येसनसुरे व त्यांची टीम, तसेच शोध व बचाव पथकाचे तारासिंग पवार व त्यांचे सहकारी यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रशासनाने केलेल्या या कारवाईमुळे धरण परिसरात अवैध बोटींव्दारे होणार्या रेती उपशावर आळा बसण्याची शक्यता आहे. स्थानिक प्रशासनाच्या या पावलाचं नागरिकांकडून स्वागत होत असून, अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी मागणीही होत आहे.