– मुलाने मुलीस फुस लावून पळवले; बेदम मारहाणीत वडिल जखमी!
– साखरखेर्डातून वर्षभरात २० ते २५ मुलींचे फुस लावून पळवून नेत लग्न; गावोगावी संतापाचे वातावरण!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – येथील मुलींना फुस लाऊन पळवून नेऊन लग्न लावून त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याचे प्रकार वाढल्याने गावात अशांतता निर्माण झाली आहे. असाच एक प्रकार काल, दि.२४ एप्रिलरोजी साखरखेर्डा बसस्थानकावर घडला असून, एका व्यक्तीस एका गटाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सात व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
साखरखेर्डा येथील एका वर्षात किमान २० ते २५ मुलींना फुस लाऊन पळवून नेऊन परस्पर विवाह लावण्याचे प्रकार घडले आहेत. काही प्रकरणात मुलींचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक असल्याने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देऊनही काही उपयोग झाला नाही. मुलगा आणि मुलगी यांचे वय लग्नाचे झाल्याने त्यांनी स्वत:च्या मर्जीने विवाह केल्याने पोलिस कोणतीच कारवाई करीत नाही. काही वेळातच दोघांचे लग्न झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे. दि.२१ एप्रिलरोजी असाच एक प्रकार घडल्याने समाजात अस्वस्थता निर्माण झाली. त्याचा परिणाम लगेच दिसून आला. पळवून नेलेल्या युवकांच्या मित्राला काही युवकांनी चांगलाच चोप दिला. हा प्रकार घडत नाही तोच, सहा महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेचा राग समाजात आजही कायम राहिल्याने विजय हनुमान जैस्वाल यांच्या मुलाने आपल्या मुलीला पळवून नेऊन लग्न करून संसार थाटला आहे. त्याअनुषंगाने २४ एप्रिल रोजी विजय जैस्वाल हा बसस्थानकावरून घरी परत जात असताना मुलीच्या नात्यातील काही युवकांनी त्याला गाठून बसस्थानकावर चांगलाच चोप देत मारहाण केली. त्यात विजय जैस्वाल हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरीश अनिल जैस्वाल यांच्या फिर्यादीवरून सात व्यक्तिंवर साखरखेर्डा पोलिसांनी कलम ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), ३२४ (४), ३३३ भारतीय न्यायसंहिता प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
साखरखेर्डा आणि साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत मुलींना फुस लाऊन पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. यामागे मोबाईल फोन हे माध्यम आहे. मोबाईल फोनवरून मुलींना आपल्या मायाजाल मध्ये ओढून त्यांना खोटे आमिष दाखवून पळवून नेण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात आपली मुलगी मोबाईलवर कोणाशी बोलत आहे, त्यांचे व्हॉटसप मॅसेज काय आहेत. हे पाहणे आई वडिलांचे तेवढे कर्तव्य आहे. परंतु, आई-वडिलांचे दुर्लक्ष याचा गैरफायदा घेऊन मुलीही आई-वडिलांना फसवित आहे. त्यामुळे साखरखेर्डा गावात सैराट चित्रपटासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातून काही अनुचित प्रकार घडू नये, हीच अपेक्षा.