– साखरखेर्डासह सिंदखेडराजा तालुक्यातील ४० ग्रामपंचायती सरपंचपदासाठी महिलांसाठी राखीव
– तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुका पहिल्यांदाच होणार थेट जनतेतून!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – सिंदखेडराजा तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीचे आरक्षण दि. १६ एप्रिल रोजी तहसील कार्यालयात काढण्यात आले होते. तर महिलांसाठी आरक्षण सोडत आज, दि. २५ एप्रिलरोजी जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. त्यात ४० ग्रामपंचायतीवर महिलाराज येणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. त्यात सिंदखेडराजा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या साखरखेर्डा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ही ग्रामपंचायतदेखील महिलांसाठी राखीव निघाली आहे.
साखरखेर्डासह ४३ ग्रामपंचायतीची निवडणूक यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे. मतदान हे जानेवारी २०२६ मध्ये महिल्या किंवा दुसर्या आठवड्यात होऊ शकते. विशेष म्हणजे, या ४३ ग्रामपंचायतीची निवडणूक पहिल्यांदाच जनतेतून होत आहे. त्यामुळे याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. साखरखेर्डा ग्रामपंचायत १७ सदस्य असलेली ग्रामपंचायत असून, थेट जनतेतून महिला सरपंच निवडून देण्याचा अधिकार मतदारांना प्राप्त झाला आहे. या अगोदर ग्रामपंचायत सदस्यातून सर्वप्रथम महिला सरपंच होण्याचा मान शीतलताई चंद्रशेखर शुक्ल यांना प्राप्त झाला होता. त्यानंतर पूनमताई महेंद्र पाटील यांना मान मिळाला होता. दोघांनाही पाच-पाच वर्ष सरपंच कालावधी पूर्ण केला होता. २०२१ साली ग्रामपंचायत निवडणूक झाली असता दीड वर्ष दाऊद कुरेशी यांनी सरपंचपद उपभोगल्यानंतर सौ.सुमनताई सुनील जगताप यांनी दोन वर्ष ११ महिने सरपंच म्हणून कारभार पाहिला. त्यानंतर ज्योती अमित जाधव यांना सरपंचपदाचा कार्यभार सोपविण्यात आला. त्यांना अवघे काही महिने मिळत आहे. २०२६ मधील जानेवारी महिन्यात निवडणूक होत असताना थेट जनतेतून महिला सरपंच निवडून द्यावा लागणार आहे. साखरखेर्डा येथील माळी, मुस्लीम, आणि अनुसूचित जाती मतदारांची संख्या अधिक आहे. माळी समाजाच्यावतीने पुन्हा सुमनताई जगताप ह्या निवडणूक रिंगणात उतरु शकतात. तर शिवसेना नेते (उबाठा) रविंद्र पाटील यांचे सर्व समाजात चांगले प्रभुत्व आहे. त्यांनी १० वर्ष सरपंच, पाच वर्ष जिल्हा परिषद सदस्य पदावर काम केले आहे. त्याच बरोबर पूनमताई महेंद्र पाटील यांनीसुध्दा पाच वर्षे सरपंच पद सांभाळले आहे. त्यामुळे पुन्हा रविंद्र पाटील यांच्या धर्मपत्नी स्नेहल रविंद्र पाटील किंवा पूनम महेंद्र पाटील निवडणूक रिंगणात उतरु शकतात. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांच्या सून ज्योती अमित जाधव ह्या सरपंच आहेत. त्याही निवडणूक रिंगणात उतरु शकतात. आज जर तरचे वारे असले तरी साखरखेर्डा गावात शिवसेना उबाठा गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, भाजप, शिवसेना शिंदे गट वेळेवर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. अखेर एकास एक लढत झाली तर कोण कोणत्या गटात सामील होईल, हे त्याचवेळी समजेल.
सिंदखेडराजा तालुक्यातील ४० ग्राम पंचायतीची महिलांसाठी राखीव , अनुसूचित जाती करीता ९ , मागास प्रवर्ग साठी ११ तर सर्वसाधारण साठी २० ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर
महिला आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आले असता अनुसूचित जाती महिलांसाठी करीता ९ , मागास प्रवर्ग महिलांसाठी ११ , तर सर्वसाधारण महिलांसाठी २० ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे .
सिंदखेडराजा तालुक्यातील अनुसूचित जाती महिलांसाठी आडगाव राजा , रताळी , तांदुळवाडी , गोरेगाव , उमनगाव , नाईकनगर , जळगाव , दत्तापूर , धांदरवाडी ह्या ग्राम पंचायतीची महिलांसाठी राखीव आहेत . मागास प्रवर्ग महिलांसाठी २० पैकी ११ ग्रामपंचायत राखीव असून त्यात वर्दडी बु . , शिंदी , सावरगाव माळ , सवडद , नसिराबाद , पोफळशिवणी , सोनोशी , पिंपळगाव लेंडी , हिवरागडलिंग , डावरगाव , हनवतखेड ( महारखेड ) सर्वसाधारण ग्राम पंचायती ४० असून त्यापैकी २० ग्राम पंचायती महिलासांठी राखीव आहेत . त्यात उमरद , झोटींगा , धानोरा , हिवरखेडपुर्णा , वाघाळा , देवखेड , दरेगाव , पांग्रीउगले , पिंपरखेड बु . , किनगाव राजा , शेंदुर्जन , साखरखेर्डा , ढोरव्ही , भंडारी , आंबेवाडी , खामगाव , कुंभेफळ , पळसखेड चक्का , भोसा , सुलजगाव या ग्राम पंचायतीचा समावेश आहे . महिलांसाठी राखीव ग्राम पंचायतीचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच पदासाठी कोण ! याचा शोध घेणे सुरु झाले आहे.
तिसरी आघाडी निर्माण झाली तर तिहेरी लढत पाहायला मिळेल. शेवटी निवडणूक ही मतदारांच्या सकारात्मक निर्णयावर होणार आहे. साखरखेर्डा गावातील पाणी प्रश्न, पथदिवे, अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन यासाठी ज्यांनी मागील काळात चांगले नियोजन केले असेल त्याला मतदान पसंती देणार आहे. केवळ जातीवर आधारित निवडणूक झाली तर काय चित्र राहिल हे सांगणे कठीण आहे.