– अजून किती कैलासांना सरकार ‘कैलासवासी’ करणार?; आ.खरात यांचा फडणवीस सरकारला जळजळीत सवाल!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – राज्य शासनाचा राज्यपालांच्याहस्ते युवा शेतकरी पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरीच, शेती आहुती मागतेय, असे पत्र लिहून जीवन संपवत असेल तर राज्यात सर्वसामान्य शेतकर्यांची काय अवस्था आहे, हे शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येवरुन अधोरेखीत होते. कैलास नागरे यांची ही आत्महत्या नसून, सरकारी व्यवस्थेने त्यांचा घेतलेला बळी आहे. अजून किती कैलासांना सरकार कैलासवासी करणार आहे? असा संतप्त सवाल मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी केला. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत मिळावी, अशी मागणीही आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली आहे. होळी सणाच्या दिवशी (दि.१३) खडकपूर्णाच्या डाव्या कालव्याचे पाणी शिवणी आरमाळ व रामेश्वर धरणात सोडून परिसराला बारामाही पाणी मिळून या परिसराला सुजलाम सुफलाम करावे, या मागणीसाठी युवा शेतकरी कैलास नागरे यांनी विष प्राशन करून हौतात्म्य पत्करले होते. त्यांच्या कुटुंबीयांची मेहकर-लोणार विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी काल, दि. १५ मार्चरोजी भेट देऊन सांत्वन केले, आणि हा प्रश्न विधानसभेत मांडून निकाली काढू, त्याचबरोबर कैलास नागरे यांनी मृत्यूपत्र लिहून मुलाचे पालकत्व शासनाने स्वीकारावे, यासाठी विधानसभेत आवाज उठवणार असल्याचे सांगितले. कैलास नागरे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याची ग्वाहीदेखील आ. खरात यांनी दिली, तसेच उपविभागीय अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून त्यांना तात्काळ मदतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या.
या भेटीप्रसंगी प्रा. दिलीप सानप, बद्री बोडखे, पत्रकार भगवान साळवे, माजी सरपंच स्वप्निल शिंदे, सतीश आरमाळ, विष्णू शिंदे यांच्यासह शिवणी आरमाळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीनंतर आ. खरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, की उच्चशिक्षित असलेले कैलास नागरे यांना शेतीची अत्यंत ओढ होती. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेती नफ्यात कशी येईल, यासाठी कायम ते प्रयत्नशील असायचे. त्यांचे अख्ख कुटुंब शेतामध्ये राबराब राबायचे. नुकतीच कैलास यांनी आपल्या शेतामध्ये खरबूज पिकाची लागवड केली होती. परंतु शिवणी आरमाळच्या धरणामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे उभ पीक शेतामध्ये पाण्याअभावी सुकायाला लागले होते. आणि, त्यामध्ये कैलास यांचे जवळपास आठ लाख रुपये नुकसानदेखील झालेले आहे. अशा विदारक परिस्थितीत कवी मनाचा संवेदनशील कैलास यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. कैलास यांनी केलेली आत्महत्या ही आत्महत्या नसून, ही या व्यवस्थेने केलेली हत्याच असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.
सरकारने कैलास नागरे यांच्या मागणीला गांभीर्याने का घेतले नाही?
आ. सिद्धार्थ खरात म्हणाले की, सामाजिक जाणीव असलेले कैलास नागरे हे वेगवेगळे आंदोलन करून सामाजिक प्रश्न हाताळायचे. त्यामध्ये त्यांनी उशालाला असलेल्या खडकपूर्णा धरणाचे पाणी आंचरवाडी फाट्यावरून जाणार्या कालव्यातून अंढेरा येथील रामेश्वर धरणामध्ये सोडावे आणि नैसर्गिकरित्या प्रवाह असलेल्या नदीच्या प्रवाहातून शासनाच्या तिजोरीवर कुठलाही भार न पडता, शिवणी आरमाळ धरणामध्ये हे पाणी यावे, अशी मागणी केली होती. अंढेरा आणि शिवणी आरमाळ या परिसरातील बर्याच गावाचा पाणी प्रश्न सोडवावा, त्यासाठी त्यांनी उपोषणसुद्धा केले. शासन दरबारी अनेक निवेदने दिली. परंतु कैलास नागरे यांच्या मागणीला गांभीर्याने घेतल्या गेले नाही. परिणामी, कवी मनाचा संवेदनशील कैलास यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. मी कैलास यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सामील असून, कैलास यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि त्यांची पत्नी आणि मुलं यांना शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी आग्रही मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली.
मृतक कैलास नागरे यांच्या पत्नीची मागणी!
लाडक्या बहिणीचे पैसे बंद करा, पण शेतीमालाला हमीभाव द्या, आणि शेतीला बारमाही पाण्याची व्यवस्था करा, अशी मागणी याप्रसंगी स्व. कैलास नागरे यांच्या पत्नी यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याशी बोलताना केली. त्या म्हणाल्या, की माझ्या पतीने या परिसरातील शेतकर्यांना बारमाही पाणी मिळावे, यासाठी आपल्या प्राण्याची आहुती दिली. त्यामुळे आमचा संसार उघड्यावर पडला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने यापुढे शेतकर्यांच्या आत्महत्या होणार नाही, यासाठी कठोर उपाययोजना केल्या पाहिजेत. वेळेप्रसंगी लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये बंद करा, मात्र शेतमालाला हमीभाव द्या, आणि या परिसरात बारमाही पाण्याची व्यवस्था करा. तसेच शासनाने मुलाचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी त्यांनी केली.
या अगोदर डिसेंबर महिन्यात शिवणी आरमाळ तलावाच्या लाभक्षेत्रात कैलास नागरे यांनी आमरण उपोषण केले होते व धरणाच्या भिंतीवरील झाडेझुडपे काढण्यासाठी दोन कोटी रुपये पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांनी आमदार मनोज कायंदे यांनी मंजूर करून दिले असून, खडकपूर्णाच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कैलास नागरे यांनी शेतकरीवर्गासाठी स्वतःची आहुती देऊन हौतात्म्य पत्करले व मृत्यूपत्र लिहून ठेवले. आता तरी हा प्रश्न सुटेल ही अपेक्षा परिसर व्यक्त करीत आहे. तसेच, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर, आ. सिद्धार्थ खरात हे नागरे कुटुंबीयांच्या सांत्वनाला येऊन गेले, पण या मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे हे अद्यापही आले नाही, याबाबत परिसरातून संताप व्यक्त होत होता.