– मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांची रविकांत तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस!
– कितीही दबाव आणला तरी आंदोलन करणारच; तुपकरांची ठाम भूमिका!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जाहीर केलेल्या मुंबईतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकर यांना आज (दि.१६) लोकशाही व शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याच्या सूचनेसह प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पाहता, हिंसक आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये नमूद आहे. दरम्यान, अशा नोटिसेसला घाबरत नाही, काहीही झाले तरी शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारच, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे, तुपकरांचे नेहमीचे आक्रमक आंदोलने पाहाता, मुंबईतील आंदोलनापुढे राज्यातील फडणवीस सरकार घाबरलेले दिसत असून, तुपकरांशी चर्चा करण्याऐवजी हे आंदोलन मोडित काढण्यासाठी बुलढाणा पोलिसांना पुढे करत असावे, अशी चर्चा शेतकरीवर्गात सुरू झाली आहे.
शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, पीकविमा, सोयाबीनचा-कापसाचा भावफरक यासह सोयाबीन-कापूस, ऊस, कांदा, धान, दूध उत्पादकाना मदत व भाववाढ आणि शेतकर्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी दि.१९ मार्चरोजी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अरबी समुद्रात सातबारे बुडवून कर्जमुक्त झाल्याची घोषणा करणार आहेत, तसेच सोयाबीन कापूस बुडवून शासनाचे लक्ष वेधणार आहेत. या आंदोलनात सहभागी होऊन स्वतःला कर्जमुक्त करण्यासाठी गावागावातील शेतकरी मुंबईला जाण्यासाठी उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. दि.१८ मार्चरोजी सकाळी ९ वाजता बुलडाणा शहरातील क्रांतिकारी हेल्पलाइन सेंटरवरून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सर्व शेतकरी मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलिसांनी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना कलम १६८ नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. तुपकरांना आंदोलन करण्यास विरोध केला गेला नसून, परंतु, जाचक अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तसेच इतरांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने हिंसक आंदोलन करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये नमूद आहे.
तर दुसरीकडे, रविकांत तुपकर आपल्या आंदोलनावर ठाम आहेत. अशा नोटिसेसने आपल्या घरातील कपाट भरलेले आहे, या नोटीसला आम्ही घाबरत नाही, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे. आमचे आंदोलन दडपण्याचा आणि शेतकरी चळवळ बंद पाडण्याचा हा शासनाचा आणि प्रशासनाचा डाव आहे, परंतु आम्ही डगमगणार नाही. शेतकर्यांच्या हक्कासाठी आम्ही आंदोलन करणारच, अशी भूमिका रविकांत तुपकर यांनी जाहीर केली आहे. शेतकर्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकर्यांच्या हक्काचा पीकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकर्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊसाला एकरकमी एफआरपी द्यावी, यासह कांदा, दूध, धान व इतर उत्पादनाना अनुदान ज्यावेळेस इतर शेतकर्यांच्या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन करीत आहोत. या आंदोलनात कुठेही हिंसा होणार नाही, कायदा हातात घेतला जाणार नाही, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत, तरीही पोलिसांनी नोटीस देऊन आमचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला आहे. अशा कितीही नोटीस दिल्या तरी आम्ही आंदोलन करणारच, असे रविकांत तुपकर यांनी सांगितले आहे.
दि. १८ मार्चरोजी सकाळी नऊ वाजता बुलढाणा येथील क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या हेल्पलाइन सेंटर समोर सगळे शेतकरी एकत्र जमणार आहेत व तेथून रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मुंबईकडे आगेकूच करणार आहेत. रात्री मुंबईच्या वेशीवर मुक्काम करून दि. १९ मार्च रोजी सकाळी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात सगळे शेतकरी नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रावर पोहोचणार आहेत. आम्ही शांततेच्या मार्गाने आमचा हक्क मागण्यासाठी जात आहोत, त्यामुळे पोलिसांनी उगीच आडवा-आडवी करू नये, आम्हाला मुंबईत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या स्थापनेनंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नांवरील पहिलेच लक्ष्यवेधी आंदोलन आहे. त्यामुळे त्यांना हे आंदोलन यशस्वी करायचे आहे; तर फडणवीस सरकार त्यांना आंदोलन करण्यास आडकाठी आणत नसले तरी, तुपकरांनी हिंसक आंदोलन करून मुंबईतील वातावरण बिघडू नये, अशी फडणवीस सरकारची इच्छा दिसते आहे. तुपकरांनी ऐकलेच नाही तर पोलिस तुपकरांना अटक करण्याचीही शक्यता आहे. सद्या तरी तुपकरांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष दिसून येत आहे. यापूर्वी तुपकरांच्या अशाच आंदोलनांनी हिंसक वळण घेतल्याचा पूर्वानुभव पाहाता, फडणवीस सरकार काळजी घेत असावे. तर आगामी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुपकर हे आंदोलन करून शेतकर्य्ाांची सहानुभूती मिळविण्याचा खटाटोप करत असल्याचे त्यांच्या राजकीय विरोधकांचे खासगीत म्हणणे आहे. त्यामुळे तुपकर हे सनदशीर मार्गाने आंदोलन करतात की, आक्रमक होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.