– डॉ. संजय रायमुलकर यांचे विधानपरिषदेवर पुनवर्सन होणार का? आज कळणार!
– भाजपकडून निष्ठावंत माधव भंडारींचा पत्ता कट, संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केनेकर यांना उमेदवारी!
– अजित पवार गटाकडे झुंबड; एका जागेसाठी ८५ जण इच्छूक! झिशान सिद्दीकी, आनंद परांजपे चर्चेत!
– शिंदे गटाकडेही इच्छुकांची रांग; शीतल म्हात्रे, रघुवंशी चर्चेत; डॉ. रायमुलकरांनाही आशा!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – विधानसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी दि. २७ मार्चरोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची उद्या, दि.१७ मार्च ही अंतिम तारीख आहे. दरम्यान, भाजपने आपल्या कोट्यातील तीन जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. संदीप जोशी व दादाराव केचे या विदर्भातील दोघांना संधी देण्यात आली असून, संजय केनेकर यांनाही उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. तर वारंवार डावलले जाणारे माधव भंडारी यांना याहीवेळेस डावलण्यात आले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोट्यातील एका जागेसाठी झुंबड उडाली असून, तब्बल ८५ इच्छुकांनी अर्ज केल्याची माहिती आहे. असे असले तरी झिशान सिद्दिकी, आनंद परांजपे यांची नावे चर्चेत आहेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातील एका जागेसाठीही इच्छुकांची भलीमाठी रांग लागली असून, मुंबईतील शीतल मात्रे, राहुल शेवाळे तसेच चंद्रकांत रघुवंशीसह अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भातील मेहकरचे माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनाही आशा असून, एकनाथ शिंदे हे त्यांना विधानपरिषदेवर घेऊन राजकीय पुनर्वसन करणार का, असा प्रश्न आहे. तसा शब्दही त्यांना यापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची विश्वासनीय माहिती आहे. दरम्यान, अजित पवार गट व शिंदे गटाला आजच आपला उमेदवार घोषित करावा लागणार असून, त्यासाठी दोन्ही गटांकडून जोर’बैठका’ जोरात सुरू आहेत.
प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, आमश्या पाडवी, राजेश विटेकर व रमेश कराड हे विधान परिषद सदस्य विधानसभेवर निवडून आल्याने या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी २७ मार्चरोजी निवडणूक होत आहे. विशेष म्हणजे, हे पाचही सदस्य महायुतीचे होते. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजप ३, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे गटाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागा आली आहे. विजयासाठी ५८ मतांचा कोटा ठरला असल्याची माहिती आहे. महाविकास आघाडीचे ४९ संख्याबळ असल्याने त्यांचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, असेही सांगितले जात असले तरी शेवटी ही निवडणूक आहे. भाजप १३२, शिंदे गट ५७ व अजित पवार गट ४१ असे विधानसभेतील संख्याबळ आहे. बहुतांश अपक्षांचा पाठिंबाही महायुतीलाच मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ही निवडणूक अविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.
यासाठी अर्ज भरण्याची उद्या, दि. १७ मार्च ही शेवटची तारीख आहे. दरम्यान, भाजपने आपल्या कोट्यातील तीन उमेदवारांच्या नावाची आजच, दि.१६ मार्चरोजी घोषणा केली आहे. त्यामध्ये संदीप जोशी नागपूर, दादाराव केचे आर्णी या विदर्भातील दोघांना संधी देण्यात आले असून, संजय केनेकर हे तिसरे उमेदवार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे एका जागेसाठी उमेदवाराची झुंबड असून, जवळजवळ ८५ जणांनी गुढग्याला बाशिंग बांधले आहे. यामध्ये अलीकडेच राष्ट्रवादी प्रवेश केलेले दिवंगत नेते बाबा सिध्दीकी यांचे पुत्र झिशान सिद्दीकी, प्रवक्ते आनंद परांजपे, रूपाली चाकणकर आदिंची नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडेही उमेदवारांची रांग असून, यामध्ये मुंबईतील माजी नगरसेविका शीतल म्हात्रे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी खासदार राहुल शेवाळे, अभिजीत अडसूळ यांची नावाची चर्चा आहेत, तर विदर्भातील मेहकरचे माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांनाही आशा आहे. तसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय पुनर्वसनाचा शब्द यापूर्वीच संजय रायमुलकर यांना दिला होता, अशी माहिती शिवसेना गोटातून समजली आहे. अर्थात, यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचीही शिफारस महत्त्वाची असणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या विधानसभा निवडणुकीत डॉ. संजय रायमुलकर हे विदर्भात सर्वात जास्त मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र त्यांचा माजी सनदी अधिकारी, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नवखे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार पराभव केलेला आहे.