– राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांची अजितदादांकडे मागणी
– आज ठरणार राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे उमेदवार!
सोलापूर (हेमंत चौधरी) – मोहोळचे माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशवंत माने यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर शहर उपाध्यक्ष तथा ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे पश्चिम महाराष्ट्र संपादक हेमंत चौधरी यांनी पक्षाध्यक्ष अजितदादा पवार यांच्याकडे केली आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादीची आज दुपारून अजितदादांसह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बैठक होत असून, या बैठकीत विधानपरिषदेचे उमेदवार निश्चित होणार आहेत. विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या एकूण ५ जागांपैकी ३ जागा भाजपच्या कोट्यात तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी आज भाजपकडून तीन उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
हेमंत चौधरी यांनी अजित पवार यांना याबाबत सविस्तर पत्रच दिले असून, त्यात नमूद आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार यशवंत माने यांना विधानपरिषदेवर संधी देण्यात यावी. कारण सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एकही आमदार नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांची कामे होत नाहीत. तसेच प्रशासनावरदेखील वचक राहत नाही. त्यामुळे आपण प्रत्येक जिल्ह्यात लक्ष घालून पक्षवाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. अशावेळी माजी आमदार यशवंत माने यांना विधानपरिषदेवर घेतल्यावर कार्यकर्त्यांना बळ मिळणार आहे. तसेच, आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने यशवंत माने यांना आमदारकी मिळणे गरजेचे आहे. माने हे मोहोळचे आमदार असताना त्यांनी सर्वात जास्त फंड आणून विकासकामे केली आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात अजित पवार गट वाढविण्यासाठी माजी आमदार यशवंत माने यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी हेमंत चौधरी यांनी केली आहे. यासाठी चौधरी यांच्यासह सोलापूर महापालिकेचे परिवहन सभापती आनंद मुस्तारे, प्रकाश गणेश कांबळे, सलिम रंगरेज, सुप्रिया पवार हे लवकरच अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी?
अजितदादांच्या राष्ट्रावादी काँग्रेसकडूनही विधानपरिषदेवर जाण्यासाठी इच्छुकांची गर्दी दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रे तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. या तिघांपैकी एकाला विधानपरिषदेवर संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. राजेश विटेकर विधानसभेत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिक्त आहे. या जागेसाठी १०० हून अधिक इच्छुकांचे अर्ज आले होते. त्यामुळे अजित पवार आता विधानपरिषदेवर कोणत्या नेत्याला संधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.