– सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यांतील ‘खडकपूर्णा’चे पाणी पेटण्याची चिन्हे!
– ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लावा; अन्यथा ‘त्या’ तलावाच्या भूसंपादन जमिनीत शेतकरी योद्धा कृती समिती करणार अन्नत्याग आंदोलन!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या उदासीनतेने शेतकर्यांच्याप्रती असलेला हलगर्जीपणा मागील काळापासून निदर्शनास येत आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का येथील पाझर तलाव ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. याकडे प्रशासन का दुर्लक्ष करीत आहे? हेच जनतेला कळायला तयार नाही. शेतीला पाणी द्या, नाही तर पुन्हा शेतकर्याचा बळी घेणार का? हा संतप्त प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. तर, ३१ मार्चपर्यंत काम मार्गी लावा; अन्यथा त्या तलावाच्या भूसंपादन जमिनीत अन्नत्याग आंदोलन करू, असा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे.
देऊळगावराजा तालुक्यामध्ये शिवनी आरमाळ येथील राज्यपाल पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरे यांनी शेतीला खडकपूर्णा प्रकल्पामधून शिवनी आरमाळ धरणामध्ये पाणी सोडा, ही मागणी केली होती. परंतु त्यांची मागणी लवकर पूर्ण होत नसल्याने, व या परिसरातील शेतकर्यांना पाणी मिळत नसल्यामुळे ते हतबल झाले आणि त्यांनी होळीच्या दिवशी स्वतःची होळी करून घेतली. याच प्रकरणासारखे सिंदखेडराजा तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्यासाठी युवा शेतकरी बालाजी सोसे हेदेखील तलाव होण्यासाठी लढत आहेत. त्याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे, जेणेकरुन त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये पळसखेड चक्का येथील खोर्यामधील तलाव ३० वर्षापासून शासनाच्या हलगर्जीमुळे प्रलंबित आहे, शेतकर्याची शेतजमीन भूसंपादन झाली असून, शेतकर्यांना त्याचा मोबदलासुद्धा मिळाला आहे, आणि संबंधित विभागाच्या नावावर त्याचा सातबारा उल्लेख आहे. हा तलाव लवकरात लवकर करण्यात यावा, म्हणून शेतकरी योद्धा कृती समितीच्यावतीने दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ रोजी संबंधित विभागाला निवेदन दिले होते. दि. ३१ मार्चपर्यंत हे काम मार्गी लागले नाही तर त्या तलावाच्या भूसंपादन झालेल्या जमिनीमध्ये शेतकरी योद्धा कृती समितीच्यावतीने अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आलेला आहे. त्यात उपोषणकर्त्यांनी खास उल्लेख केला आहे तो असा, सरकार मायबाप तुम्ही सांगा शेतकर्यांनी जगायचं कसं? आता एक तर शेतीला पाणी द्या, नाहीतर पाण्यासाठी शेतकर्याचा बळी घ्या? असा निवेदनामध्ये उल्लेख असल्याने एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासन या निवेदनाकडे आणि या मागणीकडे कशा पद्धतीने पाहते याची चर्चा सर्वत्र होत आहे. राज्यातील फडणवीस सरकार हे वैâ. वैâलास नागरे यांच्याप्रमाणे पुन्हा एकादा शेतकर्याचा बळी घेणार का? याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील शेतकर्यांचे लक्ष लागले आहे. प्रशासन कशा पद्धतीने शेतकर्यांच्या मागण्या पूर्ण करणार की, पुढे ढकलणार की, पाण्यासाठी पुन्हा शेतकर्याचा एक बळी घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्र आणि बुलढाणा जिल्हा आशेने पाहत आहे.
खडकपूर्णाच्या पाण्यासाठी शेतकरी योद्धा कैलास नागरे यांनी आपले बलिदान दिले. या भागातील शेतीसिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे अंत्यविधीला हजर होते. शेतकरी नेते रविकांत तुपकरांसह इतर शेतकरी व नेते हे कैलास नागरे यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांना धीर देऊन आले. परंतु, सिंदखेडराजा-देऊळगावराजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे यांनी मात्र याप्रकरणी एक शब्दही अद्याप उच्चारला नाही. की नागरे कुटुंबीयांच्या सांत्वनाला ते गेले नाहीत. विद्यमान आमदार मनोज कायंदे हेच नाही तर माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनाही वैâलास नागरे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना आधाराचे दोन शब्द बोलावे वाटले नाहीत, यावरून शेतकर्यांत या सर्वच नेत्यांप्रती संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
————–