– आग्या मोहोळ हटविले; मेहकर – जालना रोडवरील प्रवाशांसह ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास!
– ‘निर्मळेश्वरां’च्या भाविकांसह प्रवाशांवर आग्या मोहोळाने हल्ले चढवून पसरवली होती दहशत
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – मेहकर ते जालना मार्गावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावरील चवताळलेले आग्या मोहोळ उठविण्यात किनगाव राजा पोलिस ठाण्याचे ठाणेदार विनोद नरवाडे व ग्रामस्थांना अखेर काल (दि.२८) रात्री ११ वाजेच्या सुमारास यश आले असून, कपाशीच्या फाट्या जाळून व कटर आणि जेसीबीच्या साहाय्याने हे मोहोळ उठवून देण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून मेहकर-जालना रोड या आग्या मोहोळाच्या हल्ल्यापासून मुक्त झाल्याने जाणार्या येणार्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. प्रांताधिकारी प्रा. संजय खडसे व तहसीलदार अजित दिवटे यांनी हे मोहोळ उठविण्याकामी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. परंतु, प्रत्यक्षात महसूल प्रशासनाकडून काहीही सहकार्य लाभले नाही. चवताळलेल्या या आग्या मोहोळाने गेल्या तीन दिवसांत शेकडो भाविक-भक्तांसह दुचाकीस्वारांना हल्ले करून जखमी केलेले आहे.
मेहकर-जालना मार्गावरील पिंपळगाव लेंडी फाट्यावरील जागृत देवस्थान असलेल्या निर्मळेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेच्यावेळी हे आग्या मोहोळ अचानक उठले होते. प्रचंड चवताळलेले हे आग्या मोहोळ नंतर असंख्य भाविकांना व प्रवाशांना चावत सुटले. गेले दोन दिवस त्याचा धुमाकूळ सुरू होता. याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वारंवार आवाज उठविल्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार अजित दिवटे, नगरपालिका मुख्याधिकारी यांनी हे मोहोळ उठवून देण्यासाठी पुढाकार घेण्याचे जाहीर केले होते. तसेच, काल ११ वाजेपर्यंत हे मोहोळ उठविल्या जाईल, असेही सांगितले होते. परंतु, दिवसभरात हे मोहोळ काही महसूल प्रशासनाने उठवले नाही. त्यामुळे किनगावराजाचे ठाणेदार विनोद नरवाडे व त्यांच्या पोलिस टीमने घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक ग्रामस्थांना सोबत घेऊन रात्री कपाशीचे फाटे जाळून धूर केला, तसेच कटर व जेसीबीच्या साहाय्याने ते मोहोळ तेथून उठवून लावले.
ठाणेदार विनोद नरवाडे, त्यांचे सहकारी सुभाष गिते व मोठ्या प्रमाणात होमगार्ड व परिसरातील शेवगाव, पिंपळगाव येथील ग्रामस्थांनी अमोल पवार यांच्या जेसीबीच्या साह्याने रोडवरील फांद्या बाजूला करून हे मोहोळ उठवण्यासाठी मोहीम राबवली. कपाशीचे वाळलेले फाटे जाळून आग्या मोहोळाला उठविले तर किनगावराजा येथील खाजाभाऊ यांनी कटरच्या साह्याने फांद्या कापून मोहोळ काढून घेतले. यावेळी प्रतिष्ठित नागरिक सरपंच अंबादास लबडे, विठ्ठल गायके, आत्माराम गायके, कृष्णा पाटील, श्रीमंत गायके, सुभाष गायके, अरूण गायके, मोहन टेके, रामेश्वर गायके, शिवाजी लबडे, विष्णू गायके, योगेश केवट, ज्ञानेश्वर तिकटे यांनी पोलिसांना सहकार्य केले. हे आग्या मोहोळ तेथून हुलविण्यात आल्याने मेहकर – जालना मार्गावरून जाणार्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिस प्रशासनाचे आभार व्यक्त केले आहेत. विशेष म्हणजे, हे मोहोळ उठविण्याची जबाबदारी ज्या वन विभागाची होती, तो वनविभाग मात्र डोळ्यावर गेंड्याची कातडी पांघरून बसलेला दिसून आला. तसेच, संध्याकाळी सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, काल मी गेलो होतो. रस्ता ३० मिनिटे बंद केला होता. तिथे जास्त वेळ थांबलो नाही. परंतु आपले कोतवाल तिथेच थांबून ठेवले होते. दुसरीकडे, सदर आग्या मोहळ उठविण्यासाठी रात्री ८:१५ ते १०:३० वाजेदरम्यान परिसरातीलनागरिक जागृत होते. यावेळी किनगावराजाचे ठाणेदार विनोद नरवाडे व त्यांच्या पथकाने या वेळेत मेहकर-जालना रोडवरील वाहतूक थांबवून ठेवली होती.
या आग्या मोहोळाच्या हल्ल्यात महाशिवरात्रीच्या दिवसी प्रल्हाद रंदवे वय ७०, त्यांची पत्नी शुशला रंदवे वय ६५, तर काल दुसरबीड येथील वायद भाई हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना जालना येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. तसेच, इतर किरकोळ जखमी भाविक व प्रवाशांनी आपआपल्या सोयीप्रमाणे वैद्यकीय उपचार घेतले आहेत.