– २३० प्रकरणांपैकी परिपूर्ण असलेले तब्बल १४५ प्रस्ताव मंजूर
– ३० प्रस्तांव नामंजूर, तर ५५ प्रस्तांवातील त्रुटी दूर करण्याचे निर्देश
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग सहाय्यता योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध सामाजिक योजनांच्या अनेक फायली या तहसील कार्यालयात पडलेल्या होत्या. मात्र तहसीलदार पदांची सूत्रे हाती घेतल्यानंतर तहसीलदार अजित दिवटे यांनी मंजुरी देण्याकरिता संजय गांधी निराधार योजनेच्या तब्बल तीन बैठका घेऊन हे प्रस्ताव निकाली काढले आहेत. काल (दि.२८) देखील संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, दिव्यांग सहाय्यता या योजनांच्या प्रस्तावांचा आढावा बैठक घेऊन दाखल असलेल्या २३० पैकी १४५ प्रकरणे मंजूर केलीत. तर ३० प्रकरणे सदोष असल्याने ती नाकारली गेलीत. उर्वरित ५५ प्रकरणांमध्ये त्रुटी असल्याने त्या दूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तब्बल दीड वर्षांपासून रखडलेली ही प्रकरणे निकाली निघत असल्याने गोरगरिब लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
तहसीलदार अजित दिवटे यांनी गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी महिन्यातून एका बुधवारी तहसील कार्यालयात जमा झालेल्या फाईल्सचा निपटारा करण्यासाठी वेळ राखीव ठेवला आहे. प्रस्ताव मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, अपंग लोकांना शासन देत असलेले दरमहा अनुदान लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार अजित दिवटे यांनी दिली आहे. तसेच, पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या प्रकरणाचाही स्वतः स्पॉटवर जात निपटारा केला असून, सामाजिक योजनांचा निपटारा करण्यात तहसील प्रशासनाने गती घेतली आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांच्या फाईली दरमहा बैठका घेत, निपटारा करण्यात येत असून, दि.२१ जानेवारीरोजी झालेल्या मीटिंगमध्ये पडताळणी करून ८०९ फाईलपैकी ६०० फाईलीला मंजुरी दिली होती. त्यानंतर तिसर्या मिटींगमध्ये तहसीलदार टेबलावरील २३० फायलींपैकी १४५ फायली मंजूर करण्यात आल्या आहेत. ज्यांची कागदपत्रे व्यवस्थित आहेत, अशाच फायली त्यांनी मंजूर केल्या असून, त्यामुळे अनेक वृद्धांना, निराधार महिलांना, अपंगांना आता आधार मिळणार आहे. त्यामुळे खर्याअर्थाने तहसीलदार दिवटे हे अनेक निराधार, अपंग नागरिकांचे तारणहार ठरले आहेत.
दलालांपासून दूर रहा, थेट संपर्क साधा – तहसीलदार दिवटे
तहसीलदार अजित दिवटे यांनी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलतांना सांगितले की, तालुक्यातील अनेक नागरिक श्रावणबाळ, विधवा, अपंग व इतर सामाजिक योजनांसाठी दलालांमार्फत फायली बनवत आहेत. त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट दलाल करीत आहेत. तरी या लोकांनी दलालापासून सावध राहून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार डॉ. प्रवीण वराडे, निवासी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांना फाईलसंदर्भात कागदपत्रे दाखवून सीएससी सेंटरवर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन तहसीलदार दिवटे यांनी केले आहे.